मणीलाल राजवाडेंनी जन्माष्टमीच्या दिवशीच दगड सापडल्यानं अनेकांना तरंगणाऱ्या दगडात चमत्कार दिसला. घुनघुट्टा नदीत अंघोळ करत असताना राजवाडेंचं लक्ष दगडाकडे गेलं. तरंगणारा दगड पाहून ते चकित झाले. त्यांनी दगड पाण्याबाहेर काढला. त्यावर राम असा शब्द असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ३ ते ४ किलो वजनाचा दगड घेऊन ते गावात आले.
राजवाडेंच्या हातातला दगड पाहून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला. राजवाडेंनी दगड एका मोठ्या पिंपात टाकला. दगड पाण्यात बुडण्याऐवजी तरंगू लागला. अनेकांनी दगडावर दाब दिला. पण तरीही तो पाण्यावर येत होता. हा चमत्कार असल्याची ग्रामस्थांची खात्री पटली. त्यानंतर गावभर बातमी पसरली. हळूहळू पंचक्रोशीतले लोक दगड पाहण्यासाठी येऊ लागले.
ग्रामस्थांनी दगड मंदिरातील पुजाऱ्यांना दाखवला. हा दगड रामसेतूचा असल्याचं त्यांनी सांगितलं. नदीतून वाहत दगड इथंवर पोहोचल्याचं ते म्हणाले. त्यानंतर गावातील लोकांना दगडाची विधीवत पूजा केली. राम नाम असलेला दगड या भागातला नाही. अशा प्रकारचे दगड इथे नाहीत. तो वाहून आला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.
पाण्यावर तरंगणारा दगड? सत्य काय?
ज्वालामुखीतून निघालेले दगड अशा प्रकारचे असतात. हा दगड प्यूसिम नावानं ओळखला जातो, अशी माहिती भूगोलाचे सहायक प्राध्यापक असलेल्या डॉ. अनिल सिन्हा यांनी दिली. ‘प्यूसिम दगडाचं घनत्व पाण्यापेक्षा कमी असतं. त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. या दगडाला लहान लहान छिद्रं असतात. त्यातून गॅस बाहेर निघून जातो. हा दगड साधारण दगडांपेक्षा वेगळा असतो. दगडाच्या आतील भाग स्पंजसारखा असतो. त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. यात कोणतंही आश्चर्य नाही. ज्या वस्तूचं घनत्व कमी असतं, ती पाण्यावर तरंगते. हे सामान्य विज्ञान आहे. सूरजपूर जिल्ह्यातील घुनघुट्टा नदीच्या पात्रात आणि आसपासच्या भागात ज्वालामुखीचा उद्रेक खूप पूर्वी होऊन गेला आहे,’ अशी माहिती सिन्हा यांनी दिली.