म. टा. प्रतिनिधी, पुणेः ‘खाटांची उपलब्धता आणि मनुष्यबळाची कमतरता यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून, खासगी रुग्णालयांतील उपलब्ध खाटांची पथकांकडून नव्याने तपासणी केली जाणार आहे; तसेच करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे’ असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात खाटांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे; तसेच मनुष्यबळाची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर राव म्हणाले, ‘करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी खासगी रुग्णालयांतील खाटांची नव्याने तपासणी केली जाणार आहे. सध्या खासगी रुग्णालयांतील खाटांबाबत दररोज लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, आता पथकांकडून पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे’. ‘रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रिंसिपल सेक्रेटरी यांच्याकडे सादर केला आहे. त्यांच्याकडून या प्रस्तावाला सहमती दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ६०० विद्यार्थी हे उपलब्ध होणार आहेत’ असे राव यांनी स्पष्ट केले.

‘भविष्यातील करोनाबाधित रुग्ण किती प्रमाणात वाढणार आहेत, याचा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार खाटा उपलब्ध होतील, यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत’ असेही राव यांनी सांगितले. जम्बो सेंटरमध्ये नेमण्यात आलेल्या डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे, याबाबत राव म्हणाले, ‘सध्या नेमण्यात आलेल्या डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्याचे काम ससूनच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून करण्यात येत आहे’

३० टक्के रुग्ण जिल्ह्याबाहेरील

‘सध्या पुणे शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हा ताण कमी कण्यासाठी पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूरमध्ये सुमारे ७००, तर सोलापूरमध्ये सुमारे ६०० खाटा असणार आहेत. अन्य जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येत आहे’ अशी माहिती राव यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here