नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. सोमवारी झालेल्या घटनेनंतर भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा आमने-सामने आले आहेत. पँगाँग जवळील रेझांग ला इथं दोन्ही बाजूंनी सुमारे ४०-५० सैनिक समोरासमोर आले होते. याचदरम्यान, आता दोन्ही देशांत सैन्य स्तरावर चर्चाही सुरू आहे. पण मंगळवारी हॉटलाइनवर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये खडाजंगी झाली.

पूर्व लडाखमध्ये सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी समोरासमोर न येण्याऐवजी भारत आणि चिनी सैन्याच्या ब्रिगेडियर्सनी हॉटलाइनवर चर्चा केली. यावेळी दोघांमध्ये खडाजंगी झाली. समोरासमोर बसून चर्चा करण्याऐवजी दोन्ही देशातील सैन्यातील अधिकारी हॉटलाइनवर चर्चा करत असल्याने सीमेवरील तणाव विकोपाला गेल्याचे संकेत आहेत. यामुळेच आमने-सामने बसून चर्चा करणं शक्य होत नाहीए.

लडाखमधील मुखपरी शिखरावर चिनी सैनिकांनी चढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांच्या ब्रिगेडियर्समध्ये जोरदार खडाजंगी झाली. या शिखरावर सध्या भारतीय लष्कराचा ताबा आहे. चिनी सैनिकांनी शस्त्रं घेऊन जाणं हा मार्शल कल्चरचा मुद्दा आहे. पण भारतीय जवानांनी सोमवारी रात्री गोळीबार करून सीमेवरील प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे, असा आरोप चीनच्या ब्रिगेडियरने केला.

हॉटलाइनवर या चर्चेदरम्यान भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरनी चिनी ब्रिगेडियरचा आरोप फेटाळून लावत खडे बोल सुनावले. चीनने तात्पुरते आणि दगडी संरक्षण उभारले आहे. अशा प्रकारामुळे सीमेवरील तणाव वाढेल, असं भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरनी चिनी अधिकाऱ्याला सुनावलं. तर भारतीय जवानांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात शेपाओ माउंटनजवळ घुसखोरी केली. दोन्ही देशांदरम्यान झालेला कराराचे भारतीय सैन्याने उल्लंघन केले आहे. भारताने तातडीने एलएसीवरून सैन्य मागे घ्यावे, असं चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न कमांडचे प्रवक्ते ज्येष्ठ कर्नल झांग शुली म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here