कोलंबो : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कपमधील करो या मरो सामना हा गुरुवारी होणार आहे. हा वनडे सामना असला तरी पाकिस्तानचे भवितव्य हे ५० षटकांत नाही तर २० षटकांतच ठरणार आहे. कारण आता या सामन्यासाठी एक सुपर समीकरण समोर आले आहे. हे खास समीकरण आहे तरी काय आणि मैदानात ते कसे अंमलात आणले जाईल, याची माहिती आता समोर आली आहे.पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांचे सध्याच्या घडीला समान दोन गुण आहेत. जर या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करावा लागला तर दोन्ही संघांना समान १ गुण दिला जाईल. या परिस्थितीत दोन्ही संघांचे समान तीन गुण होतील. पण पाकिस्तानपेक्षा श्रीलंकेचा नेट रन रेट हा चांगला आहे. त्यामुळे फायनलमध्ये श्रीलंकेचा संघ पोहोचू शकतो. पण पावसाबाबतचेही काही नियम आहेत. त्यानुसार पाकिस्तानचा फैसला हा २० षटकांत होणार आहे. कारण या नियमानुसार जेव्हा दोन्ही डावांचे किमान २० षटकं होत नाहीत, तोपर्यंत या सामन्याचा विजेता ठरवता येऊ शकत नाही. रद्द झाला तर सामना अनिर्णीत राहतो, पण जर सामना निकाली लागायचा असेल तर त्यासाठी दोन्ही डावांची प्रत्येकी २० षटकं होणं गरजेची आहेत. त्यामुळे पाकिस्तानला जर आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर दोन्ही डांवांची प्रत्येकी २० षटकं होणं गरजेची आहेत आणि त्या परिस्थितीत पाकिस्तान वरचढ असणे गरजेचे आहे, तर आणि तरच पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो, कारण पावसानंतर ही गोष्टच पाकिस्तानसाठी महत्वाची असेल. दुसरीकडे जर पाकिस्तानने विजय मिळवला तर ते थेट अंतिम फेरीत पोहोचणारच आहेत.पाकिस्तानला आता आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना विजय मिळवावाच लागेल. पण त्यापूर्वी पाकिस्तानचे दोन गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा करो या मरो सामना सोपा नसेल, हे मात्र स्पष्ट झाले आहे.