श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका कर्नलसह सुरक्षा दलाचे ३ अधिकारी शहीद झाले. या चकमकीची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशीष आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलातील डीएसपी हुमायूं भट हे अधिकारी गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. चकमकी संदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडोले परिसरात मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू होती. रात्र झाल्याने चकमक थांबवण्यात आली होती. आज सकाळी सुरक्षा दलाने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. एका ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे कारवाई सुरू केली. या कारवाईचे नेतृत्व लष्कराचे अधिकारी कर्नल करत होते. त्यांनी दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली, यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कर्नल सिंग गंभीर जखमी झाले. तसेच मेजर आशीष देखील जखमी झाले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने डीएसपी भट मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोएबाशी संबंधित रेजिस्टेंस फ्रंटने घेतली आहे.