डॅनियल वादळ रविवारी लिबियाच्या किनारपट्टीवर धडकल्याने डेर्ना शहरात ७ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांचे पाणी परिसरात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे लिबियातील रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या शिष्टमंडळाचे प्रमुख यान फ्रिडेझ यांनी सांगितले. पाण्याच्या जबरदस्त आवेगामुळे धरणे फुटून त्याचे पाणी वाडी डेर्ना नदीत शिरले. त्यामुळे निर्माण झालेल्या पुराने शहराचा अन्य भागांशी संपर्कही तुटला.
पुरामुळे संपर्क तुटण्यापूर्वी डेर्नामध्ये पोहोचलेल्या मदत कर्मचाऱ्यांना सर्वत्र मृतदेह तरंगताना आढळले. घरांमध्ये, रस्त्यांवर, समुद्रातही पुरुष, स्त्रिया आणि मुलांचे मृतदेह आढळल्याचे बेनगाझी येथील मदत कार्यकर्ते इमाद अल-फलाह यांनी दूरध्वनीवरून सांगितले.
३० हजार नागरिक विस्थापित
समुद्रकिनारी वसलेल्या डेर्ना शहरात वेळेवर बचावकार्य न पोहोचू शकल्याने हजारो नागरिक बेपत्ता झाले आहेत. तसेच अनेक जण बेघर झाल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. किमान ३० हजार नागरिक विस्थापित झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेने दिली आहे. शोध आणि बचाव पथके अजूनही रस्ते, इमारती आणि समुद्रातून मृतदेह गोळा करत आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.