मुंबई : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मागणी वाढल्याने डाळींच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ झाली आहे. एकीकडे तूरडाळ १७० रुपयांवर जात असताना, चणाडाळीने ८० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. नवरात्रोत्सवापर्यंत मागणी आणखी वाढून दरवाढ होण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.

भारत हा डाळींचे सर्वाधिक सेवन करणारा देश आहे. त्यामध्ये तूरडाळ अग्रस्थानी असते. दरवर्षी ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीची मागणी देशात असते. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात ४२.२० लक्ष टन तूर उत्पादन घेण्यात आले होते. २०२२-२३चे लक्ष्य ४५.५० लक्ष टन असताना प्रत्यक्षात फक्त ३६.६६ लक्ष टन इतकेच उत्पादन झाले आहे. तुरीपासून सर्वोत्तम डाळ ही साधारण ३० टक्के, मध्यम दर्जाची ३० टक्के, तर कमी दर्जाची २० ते ३० टक्के असते. जवळपास १८ ते २० टक्के तूर ही डाळ प्रक्रियेत वाया जाते. यानुसार यंदा तूरडाळीची मागणी व पुरवठा यांच्यात साधारण ३ ते ५ लाख टनाची तफावत राहण्याची शक्यता असताना यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीतही ११.९० टक्क्यांची घट झाली आहे. त्यातच गणेशोत्सवामुळे मागणीत मोठी वाढ झाल्याने दर वधारले आहेत.

मुंबईत एन्ट्री करणे महागले, सामान्यांच्या खिशाला कात्री; चारचाकीसाठी आता एवढे पैसे मोजावे लागणार
‘गणेशोत्सवातील मागणी पाहता सर्व किरकोळ दुकानदारांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डाळींची खरेदी केली आहे. यामुळे आता घाऊक बाजारात भाव स्थिर आहेत, पण किरकोळ बाजारात तूरडाळ १६० रुपये प्रति किलोवरून १८० रुपयांकडे जात आहे. चणाडाळ ७५ ते ८० रुपयांवर पोहोचली आहे’, असे तूरडाळीचे घाऊक व्यापारी रमणिक छेडा यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

गणेशोत्सव काळात गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्यानंतर नवरात्रातदेखील पुरण व पुरणपोळी केली जाते. पुढे दिवाळीतही चणाडाळीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे गणपती ते दिवाळी हा चणाडाळीचा सर्वाधिक मागणीचा कालवधी असतो. यंदा सुदैवाने सलग दुसऱ्या वर्षी हरभऱ्याच्या पेरणीत सरासरी चार लाख टनांची वाढ आहे. त्यामुळेच चणाडाळीचे भाव ६५ रुपयांवरून ८० रुपयांवर स्थिरावले आहेत. येत्या काळात मागणी वाढली तरीही ते १०० रुपये प्रति किलोच्यावर जाणार नाहीत, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

एकीकडे मागील वर्षीची तूट, यंदा शेतीच्या दृष्टीने १२२ वर्षांत सर्वाधिक वाईट ठरलेला ऑगस्ट महिना आणि त्यात उत्सवी मागणी, यामुळे दरवाढ सुरू झाली आहे. हरभरा स्थिर आहे. परंतु केंद्र सरकारने २८ लाख टन डाळ आयातीची तयारी सुरू केली आहे. ही डाळ नाफेडमार्फत बाजारात आणली जात आहे. त्यातून दर नियंत्रणात येतील, हे नक्की. मात्र उडीद व मूगडाळीची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे.

– बसंत वैद, प्रमुख बाजार विश्लेषक, नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन

Pune News: मराठा आरक्षणाचे पुण्यात तीव्र पडसाद; मराठा क्रांती मोर्चाकडून ‘या’ भागांत आज बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here