राज्यात एक हजार ६९९ पोलिस ठाणी असून त्यासह पोलिस मुख्यालय आणि पोलिस अधीक्षकांच्या अधीनस्त विविध शाखा यामध्ये पोलिस निरीक्षकांची पदे भरली जातात. राज्यात पोलिस निरीक्षकांची सुमारे तीन हजार ५०० पदे मंजूर आहेत, मात्र दोन वर्षांपासून ही पदे भरली न गेल्याने पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो साहाय्यक पोलिस निरीक्षकांनी नाराजी व्यक्त केली. निरीक्षकांची तब्बल ८०० पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांकडे प्रभारी जबाबदारी सोपवली जात आहे.
या महत्त्वपूर्ण पदांवरील ३० ते ३५ टक्के जागा रिक्त असल्याने पोलिस दलावर कामाचा ताण वाढत आहे. दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षकांची पदे भरण्यासाठी गृहखाते, पोलिस महासंचालक स्तरावरून हालचाली न झाल्यामुळे ही पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येते. वर्षाला ४०० जागा रिक्त राज्यात दरवर्षी २०० ते २५० पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त होतात. त्या जागा पदोन्नतीने भरल्या जातात. वर्षाला सुमारे २०० निरीक्षकांना पदोन्नती दिली जाते. त्यात पुन्हा ही पदे रिक्त होतात. त्यामुळे पोलिस निरीक्षकांच्या चारशे ते साडेचारशे जागा रिक्त होत राहतात. या जागा भरण्यास विलंब झाला की, रिक्त जागांचा आकडा वाढत जातो. वेळीच नियुक्त्या न मिळाल्यास प्रभारींवर पोलिस ठाण्याचे कामकाज चालवण्याची जबाबदारी पडते.