म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एका मुस्लिम नेत्याची नियुक्ती केली जाणार आहे. या नेत्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.
मुस्लिम समाजात पंतप्रधान मोदींबद्दल आत्मियता आहे. समाजाने भारत यशस्वी होत असल्याचे पाहिले आहे, यामुळे मुस्लिम समाजाची मते मोदींनाच मिळतील. महायुतीचे सरकार खेळीमेळी व समन्वय साधून लोकहिताचे निर्णय घेत आहे. आमच्यासाठी सत्ता गौण असून राष्ट्रहित महत्त्वाचे आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
राहुल नार्वेकर हे उत्कृष्ट वकील आहेत. ते गुणवंत विद्यार्थी असून ते गुणवत्तेवरच निकाल देतील. ते कोणतीही गटबाजी किवा कुणावरही अन्याय होणार नाही, असा निकाल देतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिनचे वक्तव्य मान्य आहे का? हे महाराष्ट्राला सांगावे, मान्य नसेल तर ते इंडिया आघाडी सोडणार का? आघाडी सोडणार नसाल तर तुमचे हिंदुत्व बेगडी, तुष्टीकरण करणारे आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.