कोलकाता: मोदींच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री असलेल्या डॉ. यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये कोंडून ठेवलं. सरकार जिल्हा युनिटचा कारभार मनमानी पद्धतीनं चालवत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. पोलिसांनी सरकार यांची सुटका केली. पश्चिम बंगालच्या बांकुडामध्ये ही घटना घडली. कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं भाजप प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सांगितलं. राज्यात भाजपची स्थिती किती विदारक आहे ते या घटनेवरुन दिसल्याचा टोला सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं लगावला.मोदी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री पदाचा कारभार सांभाळणाऱ्या सुभाष सरकार दुपारी १ वाजता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आले. तेव्हा भाजपचे अनेक कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी केली आणि सरकार यांना कार्यालयात कोंडलं. ‘आम्ही सुभाष सरकार यांना मानत नाही, मानणारही नाही.. सुभाष सरकार यांना हटवा..’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.मंत्री सुभाष सरकार जवळपास अर्धा तास पक्ष कार्यालयात अडकले होते. संतप्त कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाचं दार बाहेरुन बंद केलं होतं. अखेर पोलिसांच्या पथकानं त्यांची सुटका केली. सुभाष सरकार नेते म्हणून अयोग्य असल्याचं भाजप कार्यकर्ते असलेले मोहित शर्मा म्हणाले. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना सरकार काडीची किंमत देत नाहीत. त्यांनी जिल्हा समितीवर स्वत:च्या निकटवर्तीयांना संधी दिली आहे, असा दावा शर्मांनी केला.सरकार यांना कार्यालयात कोंडणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी दिली. ‘सुभाष यांच्यावर झालेले आरोप गैरसमजातून करण्यात आले आहेत. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षात अशा घटनांना थारा नाही. कोणाला काही समस्या असल्यास त्यांनी योग्य पद्धतीनं आवाज उठवायला हवा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन आरोपींविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल,’ असं भट्टाचार्य म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here