भंडारा: भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी भाजपाचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा खर्च कमी करेन, उत्पन्न दुप्पट करेन व पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करेन असे आश्वासन दिले होते. प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख देणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशी आश्वासने दिली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र हा तर निवडणुकीतील ‘जुमला’ होता असे सांगून जनतेची फसवणूक केली. आता या भाजपाला असा ‘जुमला’ दाखवा की पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

जनसंवाद यात्रेदरम्यान भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बोलताना नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, १५ लाखांच्या आश्वासनला आपण भुललो, शेतकरीही दुप्पट उत्पनाच्या आश्वासनावर भुलले, तरुणही २ कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाला भुलले आणि बहुमताने भाजपाला सत्ता दिली. मागील ९ वर्षात भाजपाच्या सरकारने जनतेसाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसची सत्ता असताना बँकेतील पैशावर व्याज मिळत होते आता मोदी सरकार असताना तुमच्याच पैशावर कर घेतला जातो. जीएसटीने सर्वांचे नुकसान केले आहे. सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे आणि हा कर गोळा करुन मोदींनी मित्रोंची १६ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. मोदी सरकारने तरुणांना फसवले, शेतकऱ्यांना फसवले, गरिबांनाही फसवले. पंतप्रधान मोदींनी एक घोषणा केली होती २०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार, “सब को मिलेगा घर, घर में होगा नल और नल में होगा जल” पण तसे झाले का? सगळ्यांना घरे मिळाली का? मोदींनी खोटे बोलून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे.

मोदी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये कसे देतात? नानांनी आकडेमोड, गणित सांगितल्यावर लोकांच्या टाळ्या!

भाजपाच्या राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशाची मान जगात उंचावणाऱ्या महिला खेळाडूंवर अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ताठ मानेने फिरतो, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रातून ७ हजार महिला-मुली गायब झाल्या आहेत त्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंदही नाही. सावित्रीबाईच्या राज्यातून महिला व मुली गायब होत आहेत हे दुर्दैवी आहे. भाजपाने रामराज्य आणण्याचे आश्वासन दिले होते, हे रामराज्य आहे का रावणराज ? हे तर रावणराज्यच आहे. रावणाने सीतामातेचे अपहरण केले तोही उद्ध्वस्थ झाला व द्रौपदीचे वस्त्रहरण करणारे कौरवही उद्ध्वस्थ झाले. ज्यांनी ज्यांनी महिलांवर अत्याचार व अन्याय केला त्यांचे हेच होणार, भाजपाचेही तेच होणार, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ: नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टीतून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली होती. त्यांनी पूर्व विदर्भातील लोकांशी या पदयात्रेच्या माध्यमातून संवाद साधला. माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. या पदयात्रेला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला. वर्धा तालुक्याच्या तरोडा येथून सुरु झालेली पदयात्रा मदनी, करंजीकाजी, करंजीभोगे होत सेवाग्राम येथे पोहचली. या पदयात्रेत आमदार रणजित कांबळे, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दररोज पंचवीस किलोमीटर चालत या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांनी थेट जनतेशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here