मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी सव्वाचार वाजता येथील विमानतळावर येणार असा दौरा आल्याने आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी येथील विमानतळावर स्वागतासाठी आले होते. परंतु, नियोजनत दौऱ्यावनुसार मुख्यमंत्री येथे दाखल न झाल्याने उपस्थित सर्वांनाच सुमारे दोन तास ताटकळत बसून राहावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
दौरा अचानक रद्द
अंतरवाली सराटी ( जि. जालना) येथे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री शिंदे बुधवारी जाणार होते. तसा त्यांचा दौराही आला. त्यानुसार दुपारी सव्वातीन वाजता ते मुंबईहून सरकारी विमानाने छत्रपती संभाजीनगराकडे प्रयाण करणार होते. ते सव्वाचार वाजता येथील विमानतळावर येतील व त्यानंतर अंबडकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आमदार प्रदीप जैस्वाल; तसेच शिवसेनेचे काही पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी येथील विमानतळावर चारच्या आधीच उपस्थित होते. परंतु, नियोजित वेळेनुसार मुख्यमंत्र्यांचे आगमन काही झाले नाही.
आज मुख्यमंत्री जरांगे यांची भेट घेणार
आज सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईहून संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. संभाजीनगरहून ते हेलिकॉप्टरने अंबडला जाणार आहे. त्यांच्यासोबतीला मंत्री उदय सामंत आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत.