लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एक चक्रावून टाकणारा प्रकार घडला आहे. हाथरस जिल्ह्याच्या सिकंद्राराऊ परिसरात राहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे लग्नापूर्वीच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. वधूच्या घरी पोहोचण्याआधीच पोलिसांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. दारुच्या गुत्त्यावर झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी केली. याची माहिती नवरीच्या घरी समजली. त्यानंतर त्यांनी नवरदेवाच्या मोठ्या भावासोबत तिचा विवाह लावून दिला.फैसल नावाच्या तरुणाचा विवाह ११ सप्टेंबरला अलिगढ शहरातील रोरावार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील भोजपूर परिसरात होणार होता. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. सोमवारी संध्याकाळी वरात हाथरसच्या सिकंद्राराऊमधून अलिगढला जाण्यास निघाली. वरात हाथरसच्या पुढे येताच अलिगढच्या एटा मार्गावरील टोल नाक्यावर पोलीस पोहोचले. त्यांनी वरात तिथेच रोखली. त्यांनी फैसलला पडकलं आणि अकराबाद पोलीस ठाण्यात नेलं. घटनेची माहिती समजताच वऱ्हाडी मंडळी पोलीस ठाण्यात पोहोचले. कित्येक तास ते पोलीस ठाण्याबाहेर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अकराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कासीमपूरमधील एका दारुच्या गुत्त्यावरील पेटीचं कुलूप फोडून काही जण दारु आणि अन्य सामान घेऊन फरार झाले. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी आणि मोबाईल सापडला. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. दारुच्या दुकानात चोरी करणारा फैसल निकाह करण्यासाठी अलिगढ शहरातील भुजपुरा मोहल्ल्यात जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सुत्रं फिरवली. अलिगढ-एटा मार्गावरील टोल नाका ओलांडताना त्यांनी आरोपीला पकडलं. यानंतर कुटुंबीय आणि वऱ्हाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी फैसलला सोडण्यासाठी दयायाचना केली. यानंतर फैसलचा मोठा भाऊ चांद मियासोबत नवरीचा निकाहा लावण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here