Manoj Jarange Patil Angry On Those Who Accuse Corruption Maratha Reservation;मी खानदानी मराठा, ती माझी औलाद नाही, माझं ते रक्त नाही; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांसमोरच भडकले
जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मला एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी नेमकी कशाची होती? त्या प्रश्नांनी मला लोकांनी बेजार केलं. काही जणांनी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली. पण मी खानदानी मराठा आहे. कुणाच्या सांगण्यावरून उपोषण करत नाही आणि मागेही घेत नाही. लोकांना विचारूनच मी सरकारला एक महिन्याचा अवधी दिला. त्याला तमाम लोक साक्षीदार आहेत. गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्या संघटनेने हे लक्षात घ्या, असं प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांसमोरच भडकले. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या १७ दिवसांपासून उपोषण सुरू होतं. या उपोषणाची कोंडी फोडण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू होते. जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अर्जुन खोतकर सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी सातत्याने बोलत होते. दरम्यान, सरकारकडून आश्वस्त करणारी चिठ्ठी रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हाती ठेवली. त्यावेळी ही चिठ्ठी नेमकी कशाची आहे? असे प्रश्न विचारून लोकांनी जरांगे पाटलांना भांडावून सोडलं. त्यावरूनच मनोज जरांगे आज मुख्यमंत्र्यांसमोरच भडकले.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सांगता; एकनाथ शिंदे कोंडी फोडण्यात यशस्वी मनोज जरांगे पाटील म्हणाले, “दानवे दादांनी दिलेल्या चिठ्ठीने अवघड कार्यक्रम झाला. लोकांनी मला नको तेवढे प्रश्न विचारले. ती चिठ्ठी कसली? यावरून एका संघटनेने माझ्यावर आरोप केले. पण मला त्यांना सांगायचंय, मी खानदानी मराठा आहे. गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही. माझा बाप अजूनही कष्ट करतोय, मी समाजासाठी लढतोय. माझी राखरांगोळी झाली तरी चालेल पण मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. माझी ती औलाद नाही, माझं ते रक्तही नाही. माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप मी सहन करणार नाही”
गेल्या १६ दिवसांपासून मराठा समाजासाठी अन्नाचा एक कणही न खालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फळांचा ज्यूस देऊन त्यांच्या उपोषणाची सांगता केली. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण सरकार देईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी उपस्थित समाजबांधवांना दिला. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलोय, समाजाच्या वेदना मला ठाऊक आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मनोज जरांगे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचं सांगत आपणच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता, अशा शब्दात त्यांची स्तुती केली.
खिशातून काढत चिठ्ठी दिली, मध्यरात्री चर्चा केली; रावसाहेब दानवे-गिरीश महाजनांनी घेतली जरांगे पाटलांची भेट!