मुंबई: दक्षिण मुंबईतील लोकप्रिय आणि खवय्यांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या सुप्रसिद्ध बडेमियाँ हॉटेलला अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) टाळे ठोकण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने याठिकाणी धाड टाकण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, बडेमियाँ हॉटेल आवश्यक त्या परवान्याशिवाय चालवले जात असल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय, हॉटेलच्या किचनमध्ये अत्यंत गलिच्छ आणि बकाल परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले. या सगळ्यामुळे एफडीएच्या पथकाने बडेमियाँ हॉटेलला तुर्तास टाळे ठोकले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी सुरु आहे. एफडीच्या पथकाने बडेमियाँ हॉटेलवर छापा टाकला तेव्हा अधिकाऱ्यांना किचनमध्ये झुरळं आणि उंदीर फिरताना दिसले. बडेमियाँ हे मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक आहे. दक्षिण मुंबईतील कुलाब्यात ताज हॉटेलच्या मागच्या बाजूला असणारे बडेमियाँ हे खवय्यांच्या आवडीचे ठिकाण आहे. येथील अनेक पदार्थ हे लोकप्रिय आहेत. हे पदार्थ खाण्यासाठी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील अनेकजण बडेमियाँ हॉटेलला आवर्जून भेट देतात. त्यामुळे बडेमियाँ हॉटेलवरील कारवाई अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला.

बिर्याणी खाताना वाद, ग्राहक अन् हॉटेल कर्मचारी भिडले; एकाचा जीव गेला, कारण ठरला रायता

यासंदर्भात माहिती देताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आवश्यक ते परवाने मिळवेपर्यंत बडेमियाँ हॉटेल बंद ठेवण्यात येईल. यानंतर पुन्हा एकदा हॉटेलची तपासणी केली जाईल. या कारवाईनंतर बडेमिया कबाब स्पेशल हॉटेलच्या दक्षिण मुंबई आणि वांद्रे येथील शाखांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. छापेमारीवेळी FDA अधिकार्‍यांनी हॉटेलच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यावेळी धक्कादायक माहिती उघड झाली. हॉटेलकडे फूड सेफटी अँड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाचं (FSSAI) लायसन्स नसल्याचेही समोर आले. तब्बल ७६ वर्षे जुन्या हॉटेलकडे हे लायसन्स नसल्याने अधिकारीही चकीत झाले. बडेमिया कबाब स्पेशल हॉटेलच्या दक्षिण मुंबई आणि वांद्रे येथे अशा दोन शाखा सुरु होत्या. रेस्टॉरंटच्या मालकाने कारवाईनंतर बोलताना म्हटले की, त्यांच्याकडे FSSAI वगळता सर्व परवाने आहेत. एफडीएच्या अधिकार्‍यांच्या सूचनांचे पूर्ण पालन करण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here