वसई पूर्वेस गावराई पाडा येथे संत लीला शाह हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज असून या शाळेत आरोपी राजाराम मौर्य हा जेवण बनवण्याचे काम करतो. या शाळेत इयत्ता चौथीत पिडीत अल्पवयीन मुलगी शिकत असून ५३ वर्षाचा आरोपी राजाराम मौर्य याने या शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक चाळे करीत होता.
आरोपी गेल्या अनेक दिवसापासून पिडीत मुलीला पैसे देत होता. आपल्या मुलीकडे दररोज पैसे कुठून येतात? तिला कोण पैसे देत आहे? आणि कशासाठी पैसे देत आहे? याची चौकशी करण्यासाठी पीडित मुलीचे पालक शाळेत आले असता अल्पवयीन मुलीला पैसे आणि खाऊ देऊन आरोपी लैंगिक चाळे करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या घटनेनंतर शाळा परिसरात मोठा जमाव आणि नागरिक जमा झाले. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला मारहाण करणाऱ्या नागरिकांच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपी राजाराम मौर्य हा पीडित मुलीला पैशांचे आमिष दाखवून लैंगिक चाळे करत असल्याचे तिचे पालक आणि नातेवाईकांनी वाली पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी आरोपी राजाराम मौर्य याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.