भोपाळ: कौटुंबिक कारणामुळे मुलीनं आत्महत्या केल्याचं संपूर्ण परिवाराला वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात तिच्या मृत्यूमागचं कारण वेगळंच होतं. मुलीच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी तिच्या कुटुंबियांनी तिचा मोबाईल तपासला. तेव्हा त्यांना इन्स्टाग्रामवर मेसेज दिसले. ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या आत्महत्येमागचं कारण समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. गावातील पुजारी तिला त्रास देत होता. सातत्यानं धमक्या देत होता. त्याच धमक्यांना घाबरुन १६ वर्षांच्या मुलीनं आयुष्य संपवलं. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटना मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील आहे.पिपलोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावात ही घटना घडली. २९ ऑगस्टला १६ वर्षीय मुलीनं राहत्या घरात गळफास घेतला. वडिलांची प्रकृती ठीक नसल्यानं संपूर्ण कुटुंब तणावाखाली होतं. याच कारणामुळे मुलीनं आत्महत्या केली असावी असं कुटुंबाला वाटलं होतं. मुलीनं मागे कोणतीही चिठ्ठी सोडली नव्हती. आपला त्रास कोणालाही सांगितला नव्हता. त्यामुळे कुटुंबियांना आत्महत्येच्या मागचं नेमकं कारण समजायला वाव नव्हता.मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी तिचा फोन तपासला. तेव्हा त्यांना इस्टाग्रामवर गावातल्या पुजाऱ्याचे मेसेज दिसले. पवित्र सिटोके नावाचा पुजारी मेसेजवर मुलीला अश्लील शिवीगाळ करायचा. तिला धमक्या द्यायचा. पुजाऱ्याच्या धमक्यांमुळेच मुलगी तणावाखाली होती आणि त्याच कारणामुळे तिनं आत्महत्या केली, असा दावा कुटुंबियांनी केला. पिपलोद पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी मुलीच्या मोबाईलमधील चॅटही पोलिसांना दाखवलं. पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली.मुलीनं २९ ऑगस्टला आत्महत्या केली. आम्ही तक्रार नोंदवूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, असं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं. ‘आम्ही तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी फोन तपासला. तेव्हा पुजारी पवित्र सिटोकेचे मेसेज दिसले. त्यानं मुलीला धमकावलं होतं. शिव्या दिल्या होत्या. तुझी उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं होतं. त्याच्या धमक्यांमुळे मुलगी तणावाखाली होती. आम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पण त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही,’ अशी व्यथा त्यांनी मांडली.