छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील सर्व कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाला दिले होते. यामुळे विविध पातळीवर कामाला लागलेल्या प्रशासनाने १९६७ पूर्वीच्या ३३ लाख ९८ हजार महसूल व शैक्षणिक अभिलेखांची तपासणी केली. यापैकी ४१६० अभिलेखात कुणबी नोंद आढळली असल्याची माहिती विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दिली आहे. यामुळे निजामकालीन वंशावळीची अट सरकारने काढलेल्या जीआरमधून काढली नाही तर प्रशासनाने तपासलेल्या अभिलेखांपैकी सुमारे ९९ टक्के मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडताना सरकारने दिलेल्या आश्वासनांचं काय होणार, असं प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठवाड्यामध्ये सव्वा कोटी एवढी लोकसंख्या मराठा समाजाची आहे. यात गेल्या काही वर्षांपासून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केले जात आहेत. या अर्जांची गेल्या पाच वर्षाची आकडेवारी पाहता ६३२ जणांनी कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी अर्ज केले आहेत. यातील ६११ अर्ज प्रशासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे. तर यातील १९ अर्ज नामंजूर करण्यात आली आहेत. मराठवाड्यामध्ये १९७६ पूर्वी ३३ लाख ९८ हजार अभिलेख तपासण्यात आले आहेत. यापैकी शेतवार पुस्तक, हक्क नोंदी, प्रवेश निर्गम उतारा इत्यादी मध्ये ४१६० नोंदी आढळून आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड म्हणाले की, वरिष्ठांकडून मिळालेल्या निर्देशानुसार मराठवाड्यामध्ये जुन्या नोंदी तपासणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची पथकं नेमण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा, व हक्क नोंदणी इत्यादीमध्ये १९६७ पूर्वीचे ३३ लाख ९८ हजार अभिलेख तपासले आहेत.
कोणत्याही अटी-शर्तीशिवाय कुणबी प्रमाणपत्र द्या तसेच वंशावळ हा शब्द शासन अध्यादेशातून वगळा, अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे. मात्र कायद्याच्या कसोटीवर तसेच प्राप्त कागदपत्र्यांच्या आधारे हे आरक्षण न्यायालयात टिकवणे सरकारला जड जाणार आहे, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आहे.
जिल्हा- अभिलेखांची नोंद
छत्रपती संभाजीनगर- २४
बीड-८५१
हिंगोली- ११
जालना- ३५६
परभणी- २६६०
धाराशिव- १०१
नांदेड- ५१
लातूर- ४५
नांदेड- ५१