मुंबई : मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी आशा व्यक्त करताना काळजीच्या सुरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लांबलचक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मराठा तरुणांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. हे लक्षात घेऊन उपोषण मोडायचं म्हणून सरकारने न पूर्ण होणारी आश्वासने दिली नाहीत ना? अशी चिंता राज ठाकरे यांनी यामाध्यमातून व्यक्त केलीये.

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावी, यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज १७ व्या दिवशी मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फळांचा रस देऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडलं. गेली आठवडाभर शिष्टाई करत असलेल्या राज्य शासनाला उपोषणाची कोंडी फोडण्यात आज यश मिळालं. ज्यानंतर राज ठाकरे यांनी विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे.

लाठीचार्ज करणाऱ्यांचं निलंबन, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतो, आरक्षणही देतो; मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना शब्द
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात…

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.

आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.

जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं पण कुटुंबीय मागे हटेना, सरकारला इशारा देत लढण्याचा इरादा कायम!
गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल, असा टोमणा राज यांनी मारला आहे.

खिशातून काढत चिठ्ठी दिली, मध्यरात्री चर्चा केली; रावसाहेब दानवे-गिरीश महाजनांनी घेतली जरांगे पाटलांची भेट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here