मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वादात अडकलेली अभिनेत्री आज मुंबईत येत आहे. मुंबईत येण्यापूर्वी पुन्हा एकदा आपला सूर मवाळ करत तिनं महाराष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘मुंबई हे माझं घर आहे. महाराष्ट्रानं मला सर्वकाही दिलं आहे. पण मी सुद्धा महाराष्ट्राला एक भेट दिली आहे,’ असं तिनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कंगनाच्या विरोधात सध्या महाराष्ट्रात रोष आहे. शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत कंगनावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही तिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. या पार्श्वभूमीवर ती मुंबईत येत आहे. मुंबईत येणार मला अडवून दाखवा, असं आव्हान तिनं शिवसेनेला दिलं होतं. आज मुंबईत पोहोचण्याआधी तिनं एकमागोमाग एक ट्वीट करत मुंबई व महाराष्ट्राचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी घाबरणार नाही, असंही म्हटलं आहे.

वाचा:

‘मुंबई हे माझं घर आहे. महाराष्ट्रानं मला सर्वकाही दिलंय हे मान्य आहे. पण मी देखील महाराष्ट्राला एका अशा कन्येची भेट दिली आहे, जी मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही सांडू शकते. जय महाराष्ट,’ असं तिनं म्हटलं आहे.

‘१२ वर्षांची असताना मी हिमाचल प्रदेश सोडून चंदीगड येथील हॉस्टेलला गेले. तिथून दिल्ली आणि सोळाव्या वर्षी मुंबईत आले. तेव्हा काही मित्रमंडळींनी सांगितलं की मुंबईत तोच राहू शकतो, ज्याच्यावर मुंबादेवीची कृपा आहे. त्यानंतर आम्ही सगळे मुंबादेवीच्या दर्शनाला गेलो. माझे काही मित्र परत गेले, पण मुंबादेवीनं मला स्वीकारलं,’ असं तिनं दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राणी लक्ष्मीबाई हिचं शौर्य, पराक्रम आणि त्याग हे सगळं मी चित्रपटाच्या माध्यमातून जगले आहे. माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून मला अडवलं जातंय हे वेदनादायी आहे. पण मी राणी लक्ष्मीबाईंच्या मार्गावर चालणार. मी घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. जे चूक असेल त्याविरोधात आवाज उठवत राहणार,’ असं तिनं म्हटलं आहे. ‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ असा नाराही तिनं दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here