म. टा. प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने वीजेचा मोठा अपव्यय होत आहे. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९ नुसार वीजेचा जाणीवपूर्वक अपव्यय दंडास पात्र आहे. त्यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांचा वीजवापर योग्य वेळेतच करावा, अन्यथा वीजेची उधळपट्टी करून दिवसा उजेड देणाऱ्या पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायती पथदिव्यांच्या वीजवापराचे बिल भरत नसल्याने महावितरणची थकबाकी वाढत आहे. दुसरीकडे भरदिवसा पथदिवे सुरू ठेवून वीजेची मोठी उधळपट्टीही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने स्थानिक स्वराज्य संस्थांना वीजेचा अपव्यय टाळण्याची तंबी दिली आहे आणि वीजबचतीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

Pune News: पुणेकरांसाठी खूशखबर: महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, ४ हजार कोंटीचा हायवे उभारणार

नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षा व सोयीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पथदिवे लावले जातात. या पथदिव्यांना महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. परंतु, अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिवे भरदिवसा सुरू असल्याचे निदर्शनास येते. पारंपरिक पथदिव्यांसह मोठे हायमास्टचे दिवेही भरदिवसा सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होतो. राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याचा परिणाम विजेच्या निर्मितीवर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वीजेची मागणी सातत्याने वाढत असून, त्याचे खरेदी दरही महागले आहेत. अशा परिस्थितीतही अनेक नगरपंचायती व ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील पथदिवे भरदिवसा सुरू असतात.

महावितरणने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील पथदिवे केवळ सायंकाळपासून सकाळपर्यंतच सुरू ठेवावेत, दिवसा विजेची उधळपट्टी करणाऱ्या व बेकायदा वीज वापरणाऱ्या पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडण्याच्या सूचना महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here