म. टा. प्रतिनिधी, पुणे : अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध सीमावर्ती भागांत मराठा बटालियनचे सैनिक गणरायाची प्रतिष्ठापना करणार आहेत. या सैनिकांसाठी नुकत्याच दगडूशेठच्या बाप्पांची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.लष्कराच्या ३३, १९, एक, पाच आणि सहा मराठा बटालियनच्या सैनिकांनी विविध सीमावर्ती भागांत दगडूशेठच्या ‘श्रीं’ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ट्रस्टने दोन फूट उंचीची मूर्ती बटालियनला दिली आहे. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागांत केली जाते. यंदा ट्रस्टतर्फे सहा मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला दिल्या आहेत,’ अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी ऊर्जा मिळत असल्याची भावना जवानांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here