बेंगळुरू येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अवकाश परिषदेत ते बोलत होते. ‘कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या (सीआयआय) पुढाकाराने आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व ‘इनस्पेस’च्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी उद्योगांचे; तसेच ‘स्टार्टअप’चे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ते म्हणाले, ‘एसएसएलव्हीच्या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासंबंधीची जाहिरात ११ जुलैला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत २५ सप्टेंबरला संपणार आहे. आतापर्यंत देशभरातील २३ कंपन्यांचे अर्ज ‘इनस्पेस’कडे आले असून, त्यांपैकी एका कंपनीला ‘एसएसएलव्ही’चे तंत्रज्ञान लवकरच हस्तांतरित करण्यात येईल. खासगी कंपनीला प्रक्षेपकाचा संपूर्ण आराखडा आणि तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण असेल. अवकाशाशी संबंधित आणखी १९ तंत्रज्ञाने उद्योगांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया काही महिन्यांत पूर्ण केली जाईल.’
परिषदेच्या उद्घाटनाला ऑस्ट्रेलियाच्या भारतातील उपउच्चायुक्त साराह स्टोरी, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. ए. एस. किरणकुमार, सीआयआयच्या दक्षिण विभागाचे प्रमुख कमल बाली, ‘इस्रो’च्या क्षमता निर्माण विभागाचे संचालक एन. सुधीर कुमार उपस्थित होते.
‘एसएसएलव्ही’ची कार्यक्षमता सिद्ध:
– ‘इस्रो’ने विकसित केलेल्या ‘एसएसएलव्ही’ या नव्या प्रक्षेपकाच्या दोन प्रायोगिक उड्डाणांपैकी एक चाचणी यशस्वी झाली आहे.
– वजनाने हलक्या उपग्रहांना पृथ्वीनजीकच्या कक्षेत सोडण्यासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी ‘एसएसएलव्ही’ विकसित करण्यात आले आहे.
– प्रक्षेपकाची कार्यक्षमता सिद्ध झाली असून, लवकरच ‘एसएसएलव्ही’चे तंत्रज्ञान खासगी कंपनीला देण्यात येणार आहे.
गुणवत्ता निर्देशांक निश्चित:
अवकाश परिषदेच्या उद्घाटनादरम्यान ‘इनस्पेस’ आणि ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ (बीआयएस) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कंपन्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या गुणवत्ता निर्देशांकांच्या सूचीचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय अवकाश कंपन्यांनी जागतिक स्तरावर आपला दर्जा सिद्ध करण्यासाठी या सूचीमधील १५ निर्देशांकांनुसार अवकाशाशी संबंधित उत्पादन करावे, असे आवाहन ‘इनस्पेस’ने केले आहे.
नवे प्रक्षेपण केंद्र उभारणार:
केरळमधील थुंबा आणि आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटानंतर भारताचे तिसरे रॉकेट प्रक्षेपण केंद्र तमिळनाडूमधील कुलशेखरपट्टणम येथे उभारण्यात येणार आहे. ‘कुलशेखरपट्टणम येथे रॉकेट प्रक्षेपण केंद्रासाठीच्या जागेचे अधिग्रहण जवळपास पूर्ण झाले असून, लवकरच तिथे रॉकेट जोडणीचे केंद्र आणि लाँचपॅडच्या उभारणीला सुरुवात होईल. हे केंद्र एसएसएलव्ही आणि खासगी उद्योगांनी तयार केलेल्या रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात येईल,’ अशी माहिती ‘इस्रो’च्या क्षमता निर्माण विभागाचे संचालक सुधीर कुमार यांनी दिली.