म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: महापालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक कंपनीचा तोटा दोन वर्षांत ८६ कोटींवर पोहोचला असताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेतनवाढीसह सानुग्रह अनुदानाची खैरात केली जात आहे. दिवाळी दोन महिने लांब असताना सिटीलिंक महाव्यवस्थापकांच्या वेतनात १५ टक्के वाढीचा, तर कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (दि. १५) होत असलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. ठेकेदाराच्या वादामुळे आधीच सिटीलिंक संकटात असताना अधिकारी मात्र स्वत:ची पोळी भाजत असल्याचे चित्र आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी सिटीबसची सेवा महापालिकेच्या गळ्यात बांधली. नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना करत सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिकच्या माध्यमातून महापालिकेने ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवेला टप्प्याटप्याने सुरुवात केली. सद्यस्थितीत अडीचशे बसेस सुरू आहेत. नाशिककरांसाठी सिटीलिंक वरदान ठरत असली तरी ही बससेवा चांगलीच तोट्यात आहे. सिटीलिंकच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या बसेसकरिता प्रति किलोमीटर ७५ रुपयांचा खर्च होत आहे. तर, तिकीट विक्रीतून ४५ रुपये प्रति किलोमीटर महसूल मिळत असल्याने प्रति किलोमीटर ३० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात सिटीलिंकला तब्बल २०.२१ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६६ कोटींचा तोटा आहे. दोन वर्षांत तोटा ८६ कोटींत गेला असताना सिटीलिंकमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची मात्र चंगळ सुरू आहे. सिटीलिंकला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी अधिकाऱ्यांना मात्र वेतनवाढीचे वेध लागले आहेत. दोन महाव्यवस्थापकांच्या वेतनात १५ टक्के वेतन वाढ देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी या आधीही या प्रस्तावाला ब्रेक लावला असताना, या अधिकाऱ्यांनी पुन्हा प्रस्ताव ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, फरशी पूल पाण्याखाली; नागरिकांचा पुराच्या पाण्यातून मुलाबाळांसह

सानुग्रह अनुदानाचीही तयारी:

महापालिकेच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यासाठीची प्रक्रिया महिनाभर आधी सुरू केली जाते. दिवाळीला अद्याप दोन महिन्यांचा अवधी असून, पालिकेच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा अद्याप कोणताही प्रस्ताव नसताना सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घाई सुरू केली आहे.

नफा-तोट्याचे आकडे बोलतात…

८ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ कालावधीत

खर्च : ४४ कोटी २५ लाख ३७ हजार रुपये

उत्पन्न : २४ कोटी ६ लाख १२ हजार रुपये

तोटा : २१ कोटी २१ लाख १९ हजार रुपये

सन २०२२-२३

खर्च : १४४ कोटी ३१ लाख ६८ हजार १०५ रुपये

उत्पन्न : ७७ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपये

तोटा : ६६ कोटी ८३ लाख ८२ हजार रुपये

सात लाख लायसन्सची छपाई कोण करणार? परिवहन विभागाला तोडगा निघेना, वाहनचालक त्रस्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here