म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सर्व सुविधा ऑनलाइन दिल्या जातील, असे पीएफ विभागाकडून सांगण्यात आले असले, तरी अद्यापही नाव, जन्मतारीख दुरुस्तीसह अन्य कामे ऑनलाइन कार्यपद्धतीनुसार होताना दिसत नाहीत. भरीस भर म्हणजे ऑफलाइन फायली घेणे बंद करण्यात आल्याने कामगारवर्ग अडचणीत सापडला आहे.

येथील भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील कंत्राटदार, साखर कारखाने, कंपन्या, हॉटेल, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, उद्योग असे विभागात (एम्प्लॉयर अथवा इस्टाब्लिशमेंट) नोंदणीकृत आस्थापनांची संख्या १९ हजारांच्या घरात आहे. विभागात २५ लाख खातेदार आहे, तर पेन्शनधारकांची संख्या ७२ हजारांच्या घरात आहे.

दरम्यान, पीएफ विभागाने पीएफ सभासद, पेन्शनधारकांना घरबसल्या सुविधा देता याव्यात, यासाठी ऑनलाइन सुविधा दिल्या आहेत. पीएफ खात्यात किती पीएफ रक्कम जमा झाली; तसेच आगाऊ रक्कम काढण्यासह अनेक कामे त्यामुळे सोपी झाली आहे. मात्र, बहुतेक कामगारांचे उच्च शिक्षण झालेले नाही. अनेकांचे तर जेमतेम शिक्षण झालेले असून त्यांना या ऑनलाइन प्रक्रिया करणे अवघड जाते. तर ऑनलाइन कार्यपद्धती पुर्णपणे सुविधा देत नसल्याची ओरड होत आहे.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

पेन्शन एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पीएफ स्थलांतरित करण्यासाठी कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाव-आडनावातील बदल, जन्मतारखेतील चूकदुरुस्ती, पत्ता बदल अशा काही महत्त्वाच्या बदलांसाठी कामगारांना पीएफ कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. मात्र, या कार्यालयाने प्रत्यक्ष फाइल दाखल करण्याची ऑफलाइन सेवा बंद केल्याने कामगारांची कोंडी झाली आहे. ऑनलाइन सादर होत नाही, तर ऑफलाइन फाइल कार्यालयात घेत नाही अशा परिस्थितीत नाव, जन्मतारीख दुरुस्तीसाठीचे संयुक्त घोषणापत्र कसे सादर करावे, असा प्रश्न निर्माण झाल्याचे एका कामगाराने सांगितले.

एका कामगाराने पेन्शनसाठी सर्व कागदपत्रे दिले. पण गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पेन्शन मिळाली नसल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. त्यांच्या अन्य सहा सेवानिवृत्त सहकारी मित्रांनाही जन्मतारखेच्या घोळामुळे अद्याप मासिक निवृत्ती वेतन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांची होणारी अडचण लक्षात घेता कार्यालयाने ऑफलाइन कागदपत्रे, फाइल यांचा स्वीकार करावा व कामगारांचे प्रश्न निकाली काढावे, अशी मागणी होत आहे.

तिच्या पेन्शनपायी पोलिसांना टेन्शन, नवऱ्याने पाच वर्ष बायकोची बॉडी फ्रीजमध्ये ठेवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here