श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळातर्फे अन्नदान कक्ष, शारदा गजानन पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त अजित पवार पुण्यात आले होते, त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, कंत्राटी पदभरतीचा निर्णय मागील महाविकास आघाडी सरकाच्या काळात घेण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये. विरोधक आज सत्तेत नाही म्हणून आमच्यावर टीका करत आहे. कायमस्वरूपी पद भरती होईपर्यंतच कंत्राटी भरती करण्यात येणार असल्याने तरूणांनी काळजी करू नये. राज्य सरकारच्या विविध विभागामंध्ये सध्या सुमारे दीड लाख पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण या विभागांमध्ये तातडीने पद भरती करणे अपेक्षित असते. कायमस्वरूपी पद भरती होईपरर्यंत या विभागांमधील जागा रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कंत्राटी पदभरती करण्यात येणार आहे. राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, म्हणून शिक्षण थांबवता येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आले आहे, असेही पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करू: अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या बाबतची सुनावणी ६ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या बाबत निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल. पक्ष आणि चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीसाठीची तयारी पूर्ण केली आहे. सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला बोलवल आहे. त्यामुळे दोन्ही गट आपली बाजू कशी उजवी हे सांगण्याचा प्रयत्न करतील. पक्ष आणि चिन्ह ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय दोन्ही गटांना मान्य करावा लागणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.