ओझरने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी क्रिप्टो एक्सचेंजची स्थापना केली, जे २०२१ मध्ये अचानक कोसळले आणि गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन अल्बेनियाला पसार झाला. या वर्षी जूनमध्ये त्याचे अल्बेनियाहुन प्रत्यार्पण करण्यात आले असून त्याला मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि संघटित गुन्हेगारी प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. तुर्कीमध्ये मृत्युदंडावर बंदी असल्यामुळेच ओझर यांना एवढी मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, ओझरने स्वतःला निर्दोष सांगत न्यायालयात सांगितले की जर त्याचा गुन्हेगारी हेतू असते तर तो नवशिक्यासारखा वागला नसता. त्याने म्हटले की, ” मी एवढा हुशार आहे की जगातील कोणतीही कंपनी चालवू शकतो. मी वयाच्या २२ व्या वर्षी कंपनी स्थापन केली होती हे यावरून समजू शकता.” मात्र न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळून लावत त्याला कठोर शिक्षा सुनावली. ओझरसोबतच त्याची बहीण आणि भाऊही दोषी आढळले असून त्यांनाही सामान शिक्षा देण्यात आली आहे.
ओझरला एवढी मोठी शिक्षा का?
गुन्हे प्रकरणांमध्ये एकूण २,०२७ जणांना स्वतंत्रपणे शिक्षा सुनावण्यात आली असल्यामुळेच ओझर आणि भावंडांना ११,१९६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी वकिलांनी ओझरला ४०,५६२ वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती. लक्षात घ्या की तुर्कीमध्ये अशा प्रकारची शिक्षा सामान्य आहे कारण २००४ पासून देशात फाशीच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली होती.
Thodex क्रिप्टो एक्सचेंज बुडाले
काही वर्षांपूर्वी तुर्कीचे चलन, लीरामध्ये मोठी पडझड सुरू झाली ज्यामुळे तुर्की लोकांनी क्रिप्टोकरन्सी वापरण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर थोडेक्सची २०१७ मध्ये स्थापना करण्यात आली जी अल्पावधीतच देशातील सर्वात मोठ्या एक्सचेंजपैकी एक बनली. यासह ओझर देखील एक स्टार झाला आणि देशाच्या सत्तास्थापनेशी त्याची जवळीक वाढू लागली.
पण अचानक थोडेक्स एक्सचेंज एप्रिल २०२१ मध्ये बुडाली. गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले आणि ओझर फरार झाला. मात्र, गेल्या वर्षी त्याला इंटरपोलच्या वॉरंटवर अल्बानिया येथून अटक करण्यात आली होती आणि दीर्घ प्रक्रियेनंतर तुर्कीला त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले.
Thodex घोटाळा
तुर्कीच्या माध्यमांनी ओझर दोन अब्ज डॉलर्स घेऊन फरार झाल्याचा दावा केला, परंतु कोर्टाच्या सुनावणीदरम्यान गुंतवणूकदारांना सुमारे ३५६ दशलक्ष लीराचा फटका बसल्याचे उघड झाले. जेव्हा एक्सचेंज कोसळले तेव्हा ही रक्कम $४३ दशलक्ष इतकी होती, परंतु आज $१३ दशलक्ष इतकी असून यामागचे कारण म्हणजे अलीकडेच तुर्कस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असताना आंतरराष्ट्रीय बाजारात लिराच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे.