जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कोरपना तालुक्यातील नांदा गावाजवळील नाल्याला पूर आला. गुरूवारी पोळ्याच्या दिवशी या नाल्यातून बैलगाडी काढत असताना बैलगाडी वाहून जाऊ लागली. शेतकरी स्वतःचा जीव वाचवित नाल्याचा बाहेर निघाला. मात्र, सर्जा-राजा हे पुरात अडकले. आपल्या जिवलग सर्जा-राजाचा जीव वाचविण्यासाठी शेतकऱ्याने आरडाओरड केली यानंतर आसपास असलेले शेतकरी मदतीला धावून गेले. स्वतःच्या जीव धोक्यात टाकून त्यांनी बैलांना पुरातून बाहेर काढलं. किसन चौधरी असे पुरातून बचावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष
नांदा गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर पूल बांधून देण्यात यावा ही शेतकऱ्यांची जुनी मागणी. प्रशासनाला अनेकदा निवेदन दिली, लोकप्रतिनिधीकडे रेटा लावला. मात्र, पूल बांधण्यासाठी अद्याप कुठलीही हालचाल झाली नाही. शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना हा पूल ओलांडून जावं लागतं. आज घडलेल्या घटनेसारखीच घटना मागील वर्षी घडली होती आणि त्यात बैलांचा जीव गेला होता. आज पोळ्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आहे किमान आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार काय हा खरा प्रश्न आहे.
बैलपोळ्यात फडकले पुलाच्या मागणीचे फलक
गावाशेजारून वाहत असलेल्या नाल्यावर पुलाची मागणी आता जोर धरू लागली आहे. गावातील शेतकरी बांधवांनी ही मागणी आता लावून धरली. बैलपोळ्यात शेतकऱ्यांनी पुलाचा मागणीचे बॅनर लावले. या नाल्यावर पुलाची नितांत गरज आहे. किमान आता तरी शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष जाईल काय ? हा खरा प्रश्न आहे.