याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पतीचे अनैतिक संबंध असताना, पतीने पत्नीला वेळोवेळी मारहाण करत धमकी दिली. पत्नीला माहेरच्यांकडून घर खर्चासाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादाही लावला. या मानसिक तसेच शारीरिक छळामुळे पत्नीने राहत्या घरात उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले.
उपचारादरम्यान पत्नी अनिता गोठे हिचा मृत्यू झाल्याने तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पती पंकज एकनाथ गोठे, सासू बेबी एकनाथ गोठे (रा. विशाल पार्क, माऊली लॉन्स, डीजीपी नगर) तसेच पंकजची प्रेयसी यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी मयत अनिता गोठे हिच्या कुटुंबीयांनी बुधवारी अंबड पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता. मयत अनिता गोठे यांचा भाऊ नितीन सीताराम निर्भवणे यांनी अंबड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या महिलेला २०१४ पासून ते २०२३ पर्यंत त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पतीच्या अज्ञात प्रेयसी विरोधात देखील तक्रार देण्यात आली असून तिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.