Mumbai Local : दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलणार; लोकल फेऱ्यांच्या वेळेतही बदल, असे आहे नवे वेळापत्रक – dadar platform numbers to change new schedule of local trains
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक दोन बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अर्थात दोन महिन्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील सर्व फलाटांचे क्रमांक बदलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानक एकाच ठिकाणी आहेत. मात्र दोन्ही रेल्वे स्थानकांतील फलाट क्रमांक स्वतंत्र आहे. नव्याने येणाऱ्या प्रवाशांना स्वतंत्र फलाट क्रमांकामुळे गोंधळ निर्माण होतो. प्रवाशांचा गोंधळ कमी व्हावा आणि दोन्ही यंत्रणेच्या फलाट क्रमांकात सुसूत्रता यावी, यासाठी एक ते पंधरा असे सलग फलाट क्रमांक देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे फलाट क्रमांक जैसे थे राहणार असून मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांकात बदल होणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. फलाट रुंदीकरणानंतर फलाट क्रमांक २ उपलब्ध राहणार नाही. यामुळे सध्याच्या फलाटांना नव्याने क्रमांक देण्यात येणार आहे.