म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चार संशयितांच्या पोलिस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. अपहरणकर्त्यांकडून एक कोटी ३३ लाखांची रोख रक्कम हस्तगत केल्यानंतर पन्नास लाख रुपयांचा खर्च अथवा रक्कम याबाबतचा शोध अद्याप सुरू आहे. यासह पसार झालेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाने पुन्हा राजस्थानातील जोधपूर गाठले आहे.

दि. २ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता राहत्या घराबाहेरून व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करून ३ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता सुटका करण्यात आली. याप्रकरणी मुख्य सूत्रधार महेंद्र ऊर्फ नारायणराम बिष्णोई (३०, रा. मोर्या, लोहावत, राजस्थान), पिंटू ऊर्फ देवीसिंग बद्रिसिंग राजपूत (२९, राजेंद्रनगर, पाली, राजस्थान), रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई (२०, फुलसरा छोटा, बजू, बिकानेर, राजस्थान) आणि अनिल भोरू खराटे (२५, लहानगेवाडी, वाडीवऱ्हे) हे संशयित पोलिस कोठडीत आहेत. यापैकी खराटे हा पारख यांच्या वाडीवऱ्हे येथील जागेच्या वॉचमनचा मुलगा आहे. अल्पावधीत पैसे कमविण्यासाठी ‘लॉरेन्स बिष्णोई गँग’च्या नावाचा वापर करून या संशयितांनी पारख यांचे अपहरण करून खंडणी वसूल केली. दरम्यान, इंदिरानगर पोलिसांत दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाने भारत-पाक सीमेवर जाऊन तपास करून चार संशयितांना बेड्या ठोकल्या. या संशयितांनी दोन कोटी रुपये घेतल्यानंतर पारख यांची सुटका केल्याची कबुली दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने पोखरण, जोधपूरमध्ये तळ ठोकून वेशांतर करून संशयितांचा माग काढत खंडणीचे पैसे हस्तगत केले. मात्र, त्यापैकी पन्नास लाख रुपये संशयितांनी कुठे खर्च केले अथ‌वा दडविले आहेत, यासंदर्भातील तपास सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी संशयिताची कोठडी वाढविण्याची केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.
उसाबाबत महत्त्वाची बातमी: परराज्यात निर्यात करण्यास महाराष्ट्र सरकारने बंदी घातली, कारण…

पारख यांच्या हाताला दुखापत

अपहरणावेळी संशयितांनी पिस्तुलाचा धाक दाखवून बळजबरीने हेमंत पारख यांना राजस्थानातून आणलेल्या वाहनात बसविले. त्यावेळी पारख आणि अपहरणकर्त्यांमध्ये झटापट झाली. यात पारख यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. तसेच त्यांच्या हातालाही किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले आहे. पोलिसांच्या तपासावेळी संशयितांनी मारहाणीबाबत माहिती दिली. त्यानंतर पारख यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केल्यावर हाताला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Mumbai Local : दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलणार; लोकल फेऱ्यांच्या वेळेतही बदल, असे आहे नवे वेळापत्रक

‘क्रेडाई’, ‘मनसे’तर्फे पोलिसांचे कौतुक

पारख अपहरण गुन्ह्याची अकरा दिवसांत उकल करून अतिशय खडतर स्वरुपात तपास केल्याप्रकरणी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे पोलिस आयुक्तांची भेट घेत अभिनंदन करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे आणि गुन्हे युनिट एकच्या पथकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, घटना समितीचे अध्यक्ष जितूभाई ठक्कर, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, शशी जाधव, दीपक बागड, जयंत भातांब्रेकर, नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, मनोज खिंवसरा, हंसराज देशमुख, ऋषिकेश कोते, अंजन भालोदिया, सतीश मोरे, सागर शहा उपस्थित होते. यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, अमित गांगुर्डे, संदीप जगझाप यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांना संसदेसह विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण द्या, विशेष अधिवेशनात विधेयक पास करा, मोदींकडे कुणी केली मागणी?

परभणीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, तरुणांचा धिंगाणा, पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं घडलं काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here