राहुल नवीन हे १९९३ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. आजपासून ते ईडीचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहतील. राहुल नवीन हे ईडीमध्ये २०२० पासूनचं कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२० पासून ते ईडीमध्ये वेशष संचालक म्हणून कार्यरत आहेत. आता एस. के. मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांना प्रभारी संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून ईडीच्या संचालकपदी नियमित नियुक्ती होत नाही तोपर्यंत राहुल नवीन काम पाहतील.
ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज संपला. संजय कुमार मिश्रा यांना ईडीचे संचालक म्हणून केंद्र सरकारनं तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ १८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत होती. संजय कुमार मिश्रा यांनी २०१८ मध्ये ईडीचे संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांचा नियमित कार्यकाळ संपल्यानंतर तिसऱ्यांदा मुदतावढ देण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टानं ११ जुलै रोजी तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ अवैध ठरवली होती. त्यानंतर त्यांना ३१ जुलैपर्यंत पद सोडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, केंद्राच्या विनंतीनंतर त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला संजय कुमार मिश्रा यांना १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. मात्र, कोर्टानं आम्ही त्यांच्या नियुक्तीसंदर्भात २०२१ मध्ये एकदा आदेश दिलेले आहेत असं म्हणत १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. अखेर आज संजय कुमार मिश्रा यांचा ईडीमधील कार्यकाळ संपला आहे.
संजय मिश्रा यांच्या मुदतवाढीविरोधात काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला, जया ठाकूर, महुआ मोईत्रा, साकेत गोखले यांनी याचिका दाखल केल्या होत्या.