कोलंबो : भारताचे फलंदाज एकामागून एक धारातीर्थी पडत होते, पण त्यावेळी एकच फलंदाज खेळपट्टीवर उभा राहीला होता आणि तो म्हणजे शुभमन गिल. या सामन्यात गिलने एकाकी झुंज दिली आणि शतकही झळकावले. पण भारताचा विजय दृष्टीपथाच दिसत असताना तो बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. गिलने या सामन्यात आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १२१ धावांची खेळी साकारली. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि सामन्याचा नूर बदलला. गिल बाद झाल्यावर अक्षर पटलने संघाची जबबादारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याने विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले. पण अक्षर ४२ धावांवर बाद झाला आणि भारताच्या हातून सामान निसटला. बांगलादेशने यावेळी सहा धावांनी भारतावर विजय साकारला.बांगलादेशच्या २६६ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला खरा, पण भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहितने गेल्या तीन सामन्यांत सलग तीन अर्धशतके लगावली होती. पण या सामन्यात मात्र रोहितला भोपळाही फोडता आला नाही. रोहितनंतर फलंदाजीला आला तो तिलक वर्मा. तिलकला यावेळी पदार्पण करण्याची संधी दिली होती. त्यामुळे टी-२० गाजवलेला तिलक या सामन्यात कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण तिलकला यावेळी आपण नेमका कोणता चेंडू सोडत आहोत, तेच समजले नाही. त्यामुळे तिलक हा फक्त पाच धावांवर असताना क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर फलंदाजीला आला तो के एल राहुल. राहुलकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या, कारण तोच यावेळी अनुभवी खेळाडू मैदानात होता. पण राहुलने यावेळी निराशा केली. राहुल यावेळी १९ धावांवर बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. राहुलनंतर फलंदाजीला आला तो इशान किशन. इशान धडाकेबाज फटकेबाजी करेल, असे सर्वांना वाटत होते. पण एक मोठा फटका मारण्याच्या नादात त्याच्याकडून चूक झाली आणि तो पाच धावा करून तंबूत परतला.इशाननंतर फलंदाजीला आसा तो सूर्यकुमार यादव. सूर्याने यावेळी आपल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण २६ धावांवर असताना तो बाद झाला. सूर्यानंतर फलंदाजीला आलेला रवींद्र जडेजा यावेळी फक्त सात धावा करून शकला. ही सर्व भारतीय संघाची पडझड सुरु होती. पण त्यावेळी भारताला सावरले ते एकट्या गिलने. पण मोक्याच्या क्षणी गिल आऊट झाला आणि हा सामना आता भारत जिंकणार की नाही, हा प्रश्न चाहत्यांपुढे पडला होता.