मुंबई : गणेशोत्सव ते दिवाळी या काळात अन्नधान्याची मागणी वाढती असते. या वाढत्या मागणीमुळे डाळींच्या किमती वधारू लागल्या आहेत. तशीच २५ टक्के मागणी खाद्यतेलांची देखील वाढण्याचे संकेत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे खाद्यतेलांचे दर सध्या तरी मध्यम किमतीवर स्थिर आहेत.

भारत हा जगातील सर्वाधिक तेल वापरकर्ता देश आहे. भारतात दरवर्षी २.२० कोटी टन खाद्यतेलाचा वापर होतो. भारतात एकूण मागणीच्या ४० ते ४५ टक्केच खाद्यतेल तयार होते. उर्वरित खाद्यतेल आयात केले जाते. एकूण आयातीत जवळपास ६५ टक्के पामतेलाचा समावेश असतो. भारतात तयार होणाऱ्या ४५ टक्के खाद्यतेलात जवळपास २५ टक्के सोयाबीन व त्यापाठोपाठ राइसब्रान (तांदळपासून) आणि भुईमुग यांचा समावेश असतो. यंदा भुईमुग पेरणीत तूट असली तरीही तांदळाचे पीक दमदार येण्याची चिन्हे आहेत. तसेच सोयाबीनची पेरणीदेखील समाधानकारक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता खाद्यतेल मागणी मात्र वाढलेली आहे.

Maharashtra Weather Forecast: राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…
याबाबत अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला सांगितले की, ‘यंदा गणेशोत्सव ते दिवाळीदरम्यान खाद्यतेल मागणी २५ टक्क्यांच्या वाढीचे संकेत आहेत. मात्र जगभर तेलबियांचा मुबलक साठा आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. परिणामी आयात स्वस्त झाली आहे. भारताला तसेही दरवर्षी खाद्यतेलाची आयात करावी लागतेच. यंदा आयातीत तेल काही ठिकाणी देशांतर्गत तेलापेक्षा स्वस्त उपलब्ध होत आहे. त्यामुळेच दमदार आयातीमुळे मागणीत वाढ झाल्यानंतर दर स्थिर असतील.’

करोनानंतर सन २०२१-२२ दरम्यान भारतात जवळपास ११ लाख टन खाद्यतेलाची आयात होत होती. तो आकडा मागीलवर्षी १४ लाख टनावर गेला. आता यंदा तो आकडा १८ लाख टनाच्या घरांत जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी १५ ते १६ लाख टन खाद्यतेलाची आयात ही सर्वाधिक मागणीचा काळ असलेल्या गणेशोत्सव ते दिवाळीदरम्यानच होईल, असे खाद्यतेल महासंघाने म्हटले आहे.

बंदरावर तेल, तेलबिया दाखल

‘भारतातील मोठ्या बंदरांवर मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात सुरू आहे. एकट्या मुंबईच्या बंदरावर सध्या दीड लाख टनाहून अधिक खाद्यतेल किंवा तेलबिया दाखल झाल्या आहेत. त्यामुळेच दर स्थिर आहेत. पावसाने दडी दिल्याने भूईमुग वगळता तेलबियांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र भुईमुगाचा बाजारावर फार परिणाम नाही’, असे खाद्यतेल महासंघाचे समिती सदस्य मितेश शैय्या यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

खाद्यतेलाची स्थिती अशी (दर रुपये प्रतिकिलो )

तेलाचा प्रकार जून सध्या

शेंगदाणा १७५-१८५ १८०-२००

सूर्यफुल १२०-१३० ११०-११५

सोयाबीन ११०-१२० ९५-१०५

राइसब्रान ९०-१०५ ९५-१००

पाम ८५-१०० ७५-८५

मुंबईकरांचा शेवटच्या डबल डेकरला भावूक निरोप, चालक-वाहकांसोबत केक कापून जुन्या आठवणींना उजाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here