ही घटना हॉटेल राम इंटरनॅशनल मध्ये शुक्रवारी दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सुधीर मुनगंटीवार राम हॉटेलमध्ये आले. त्यांनी काही दिवस अगोदरच या हॉटेलमधील एक सूट तीन दिवसांसाठी बुक केला होता. सूट बुक केलेला असल्यामुळे ते निर्धास्तपणे हॉटेलमध्ये आले, तिथे आल्यावर त्यांना आपला सुट रद्द करण्यात आल्याचे कळाले. त्यांनी माहिती घेतली असता जिल्हाधिकाऱी कार्यालयाने मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने येणाऱ्या मंत्र्यांसाठी हे हॉटेल ताब्यात घेतले आहे, असे कळाले आणि सूटची अदलाबदल त्यांनीच केल्याचे समजले. त्याचवेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हॉटेलमध्येच होते. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जवळ बोलावले आणि ‘मी स्वत: बुक केलेला सुट तुम्ही कोणत्या अधिकारात रद्द केला,’ असा सवाल विचारला.“मंत्र्यांसाठीच तुम्ही हे हॉटेल ताब्यात घेतले, मी पण मंत्रीच आहे. मी स्वत:हून सुट बुक केला आणि तो तुम्ही परस्पर रद्द करता, रद्द केल्याची कल्पनाही देत नाहीत,’ असे म्हणत मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुनंगटीवार यांचा संताप पाहून जिल्हाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दुसरा सूट तुम्हाला करून देतो असे ते म्हणू लागले. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. ते शुक्रवारी मुक्कामाला येणार होते, पण शनिवारी सकाळी ते दाखल होणार असल्याचे कळाल्यावर फडणवीसांसाठीचा सूट मुनगंटीवार यांना देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली; त्यावर रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.