म. टा. प्रतिनिधी, पुणे: रेल्वे स्थानकावर स्टॉल देण्याच्या कारणावरून स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष महिलेसह दोघींचे अपहरण करून त्यांच्याकडे १७ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गुंडांसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली.

बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४५, सरडे बाग, उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते (वय ३९, रा. गणेशनगर, एरंडवणा), प्रदीप प्रभाकर नलवडे (वय ३८, रा. भूगाव), अक्षय मारुती फड (वय २४, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पीडित महिलेने व तिच्या मैत्रिणींनी पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात स्टॉल मिळवून देण्याचे आश्वासन देऊन बाबूलालकडून काही रक्कम घेतली होती. स्टॉल न मिळाल्याने बाबूलाल आणि त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून दोन महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले. आरोपींनी या महिलांच्या घरी फोन करून महिलेच्या मुलाकडे १७ लाख रुपये खंडणी मागितली. पैसे न दिल्यास महिलांना ठार मारण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या मुलाने पोलिसांकडे धाव घेतली.

गुन्हेगारी वाढली, हवेली पोलिसांनी गुंडांची धुलाई करत रस्त्यावरुन धिंड काढत दहशत मोडली!

पीडित महिलांना उत्तमनगरमध्ये आरोपींच्या घरात डांबून ठेवल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे पोलिस अंमलदार शंकर संपते यांना मिळाली. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, विजय गुरव, प्रदीप शितोळे, विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, शंकर संपते, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, आशा कोळेकर यांनी आरोपींना पकडून महिलांची सुटका केली. चारही आरोपींना उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींनी महिलांना मारहाण केली होती. जखमी अवस्थेत महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शरद मोहोळ टोळीला शस्त्रांचा पुरवठा

आरोपी बाबूलाल मोहोळ याच्यावर खून, दरोडा, दंगल, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुंड शरद मोहोळ याच्या टोळीला बाबूलाल शस्त्रे पुरवीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पवना धरणातील बंदिस्त जलवाहिनीविरोधात शेतकरी आक्रमक; भाजप नेत्याचा सरकारला इशारा, म्हणाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here