जयपूर: राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचे बूट सात वर्षांपूर्वी मंदिराच्या समोरुन चोरीला गेले. या प्रकरणी त्याला पोलिसांनी आता फोन केला आहे. स्टेशनला या आणि तुमचे बोट ओळखून घेऊन जा, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं.मत्स्य विभागात सहायक संचालक पदावरुन निवृत्त झालेले महेंद्र कुमार दुबे सात वर्षांपूर्वी राजस्थानच्या चित्तोडगढ जिल्ह्यातील सांवरिया सेठ मंदिरात दर्शनाला गेले होते. तिथे त्यांचे बूट चोरीला गेले. २०१७ मध्ये ही घटना घडली. बूट चोरीला जाताच महेंद्र कुमार यांनी मनसफिया पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. चोरीची घटना १४ जानेवारी २०१७ मध्ये घडली होती. आता काही दिवसांपूर्वीच दुबे यांना पोलीस कर्मचारी खूबचंद यांचा फोन आला. मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे चोरीला गेलेले बूट जप्त करण्यात आले आहेत. तुम्ही पोलीस ठाण्यात या आणि तुमचे बूट ओळखून घेऊन जा, असं त्यांना सांगण्यात आलं. दुबे यांचे बूट चोरीला जाऊन ७ वर्षे उलटली आहेत. त्यांना आता फोन येण्यामागचं कारण ऑगस्ट २०२३ मध्ये झालेली एक पोलीस तक्रार आहे. गेल्याच महिन्यात एका न्यायाधीशाच्या मुलाचे बूट याच मंदिर परिसरातून चोरीला गेले. त्यानं तक्रार नोंदवली. याबद्दलची बातमी महेंग्र कुमार दुबेंनी वर्तमानपत्रात वाचली. त्यानंतर त्यांनी ७ वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या बूटांबद्दल आणि त्याबद्दल नोंदवण्यात आलेल्या तक्रारीबद्दल पोलिसांकडे विचारणा केली. पोलीस ठाण्यात या आणि तुमचे बूट ओळखा, असं दुबेंना सांगण्यात आलं. त्यावर दुबेंनी बुटांचे फोटो पाठवा, त्यातून माझे बूट ओळखतो, असं पोलीस कर्मचाऱ्यास सांगितलं. पण कर्मचाऱ्यानं त्यांना पोलीस ठाण्यातच येण्याची सूचना केली. तुम्ही या, बूट ओळखा, जबाब नोंदवा आणि मग तुमचे बूट घेऊन जा, असं कर्मचाऱ्यानं सांगितलं. यामुळे दुबे वैतागले. आता मनसाफियाला गेलो, तर बूटांपेक्षा अधिक खर्च येण्याजाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासावर होईल. त्यामुळे तिकडे जाणारच नाही, अशी माहिती दुबेंनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here