म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वितरित करताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, प्रसाद स्वतः तयार करून वितरित करणाऱ्या मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मंडळांना दिल्या आहेत.

गणेश मंडळांनी काय करावे?

– आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद भाविकांना देण्यात यावा, शिळ्या अन्नपदार्थांचे वाटप करू नये.
– प्रसाद काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा.
– प्रसाद हाताळणाऱ्यांचे कपडे स्वच्छ असावेत, त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामाला सुरुवात करावी.
– संसर्गजन्य आजार झालेल्यांनी प्रसाद तयार करू नये.
– प्रसाद तयार करणाऱ्यांनी आणि वाटप करणाऱ्यांनी नाक, कान, डोके, केस खाजवणे, डोळे चोळणे, शिंकणे, थुंकणे, नाक शिंकरणे टाळावे.
– प्रसाद तयार करणाऱ्यांनी तंबाखू, धूम्रपान करणे टाळावे.
– वाटप करणाऱ्यांनी हात पुसण्यासाठी स्वच्छ कापड वापरावे.
– प्रसाद तयार करणाऱ्यांनी हातमोजे आणि अॅप्रन घालावे. केस संपूर्णपणे झाकणारी टोपी वापरावी. तोंडाला मास्क लावावा.
– प्रसाद तयार करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.
– पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झाकलेले असावे.
– निर्जंतुकीकरण करूनच पाणी पिण्यास द्यावे. भांड्यांचा वापर करण्यापूर्वी ती धुण्याच्या साबणाने, द्रावणाने स्वच्छ घासावीत.
– भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा; तसेच भांडी स्वच्छ, कोरड्या जागेत ठेवावीत.
Ganeshotsav 2023: नागपूरकरांनो यंदाच्या गणेशोत्सवात हे नियम पाळावेच लागणार; हायकोर्ट म्हणाले…
प्रसाद तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन १०० रुपये शुल्क भरून अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद करावी. मंडळांनी कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले आणि कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातून खरेदी करावे.- सु. ग. अन्नपुरे, सहआयुक्त, ‘एफडीए’ (अन्न)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here