२-३ दिवसात पावसाचा जोर वाढणार
पुढील २-३ दिवसांत उत्तर महाराष्ट्र, कोकण पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यात आज ढगाळ वातावरण असून अधूनमधून जोरदार सरींची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. १६ ते १८ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई आणि विदर्भातही सोमवारपर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भाला येलो अलर्ट
कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतेक परिसरात सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. तसेच, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या २ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो आहे. तर उत्तर महाराष्ट्रादेखील जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
१३ जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी
राज्यातल्या तब्बल १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा बरंच कमी आहे. छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना मराठवाड्यासाठी काळजीची बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील ८ पैकी ६ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी आहे. सद्धया राज्याच्या काही भागात पाऊस सुरू असला तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता नाहीये.