लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. पोलिसांना नाल्यात एक हात मृतदेह सापडला. त्याचे हात आणि शिर नव्हतं. या तरुणाची ओळख पटली. तो शेजारच्या मुझफ्फरनगर जिल्ह्याचा रहिवासी होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कुटुंबियांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली. अंत्यविधीला काही तास राहिले असताना मुझफ्फरनगरवरुन बेपत्ता झालेला तरुण चंदिगढमध्ये जिवंत सापडला. तिथे तो प्रेयसीसोबत राहत होता. यानंतर पोलिसांनी नाल्यात सापडलेला मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी नेला.९ सप्टेंबरला मेरठच्या दौराला परिसरातील नाल्यात एक मृतदेह शिर आणि हात नसलेल्या स्थितीत सापडला. मेरठ पोलिसांनी वायरलेसवर याबद्दल मेसेज दिला. मुझफ्फरनगरच्या मंसूरपूर परिसरात राहणारा २० वर्षांचा माँटी कुमार काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याबद्दल त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली. माँटीचं कुटुंब मेरठमधील पोस्टमॉर्टम हाऊसला पोहोचलं. माँटीच्या मानेवर आणि हातांवर टॅटू होते. त्यामुळे मारेकऱ्यांनी त्याची ओळख लपवण्यासाठी हेच अवयव वेगळे केले असावेत, अशी शक्यता कुटुंबियांनी बोलून दाखवली.कुटुंबियांनी मृतदेह ओळखला आणि तो मुझफ्फरनगरला नेला. तिथे अंत्यविधीची तयारी सुरू झाली. तितक्यात माँटी जिवंत असल्याची माहिती समोर आली. माँटी चंदिगढमध्ये १८ वर्षांच्या एका तरुणीसोबत राहत असल्याचा तपशील समोर आला. प्रेमसंबंध असल्यानं तरुणी माँटीसोबत पळाली होती. तिच्या कुटुंबियांना माँटीविरोधात मंसूरपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती.मंसूरपूर पोलिसांनी माँटी आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचा मोबाईल नंबर ट्रॅक केला होता. त्यामुळे कुटुंबियांनी दावा केलेला मृतदेह माँटीचा नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेतला. दुसरीकडे माँटीसोबत पळालेल्या तरुणीच्या शेजाऱ्यानं तिला पाहिलं होतं. त्यानं या घटनेची माहिती तरुणीच्या वडिलांना दिली. ही तरुणी स्वत: सोबत घरातील ५० हजार रुपये आणि दागिने घेऊन पळाली होती.माँटीच्या कुटुंबियांनी वेगळ्याच मृतदेहावर दावा सांगितला. मृतदेह माँटीचाच असल्याचं म्हणत त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केलं. माँटीच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस पुरेशी पावलं उचलत नसल्याचा आरोप करत माँटीच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here