ठाणे: मौजमजेसाठी भुरट्या चोऱ्या करणारे ठग ठिकठिकाणी बघायला दिसत असले, तरी एका चोरट्याने यासाठी चक्क मंदिरांच्या दानपेट्यांना लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. ठाणे पूर्व भागात मंदिरात चोरीच्या तयारीत असणाऱ्या एका सराईत चोराला नागरिकांच्या सहकार्याने कोपरी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याने ठाणे, डोंबिवली, कल्याणसह पुणे, नाशिक, माणगाव शहरातील मंदिरांमध्येही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
गावकऱ्यांच्या वाटेला वेदनाच! ‘इथं’ पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची वाट बघावी लागते; कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ओम सातपुते (३८) असे या चोरट्याचे नाव आहे. ठाणे पूर्व साईनाथ नगरातील हनुमान मंदिरात काही दिवसांपूर्वी एका चोरट्याने दिवसाढवळ्या मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. सकाळच्या वेळेत ही चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. या चोरीसंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चोरीची पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसल्याने पोलीस त्याच्या मागावर होते.

मंदिरातील दानपेटीतील रक्कम सुलभपणे चोरता येत असल्याने चटक लागलेला हा चोरटा ठाणे पूर्वेकडील आदर्श नगर सप्तशृंगी मंदिरात चोरी करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या संशयास्पद हालचाली बघून नागरिकांनी हटकले. त्याच वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याला ओळखून ताब्यात घेतले. कोपरी पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच ओम याने हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याने यापूर्वी ठाणे, कल्याण, डोंबिवली, माणगाव, नाशिक, पुणे शहरांमधील मंदिरांमध्ये चोरी केल्याची माहिती कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हूंबे यांनी दिली.

काल शेतकऱ्यांच्या बांधावर तर आज शेतकऱ्यांमध्ये मिसळले, आदित्य ठाकरेंनी समस्या जाणून घेतल्या

मंदिरात चोरी करण्यापूर्वी हा चोरटा संपूर्ण मंदिराची पाहणी करत असे. जवळच्या चाव्यांच्या जुडग्याचा वापर करून, मास्टर-कीला तेल लावून तो दानपेटीचे कुलूप उघडत असे. स्वत:च्या चैनीसाठी त्याने अनेक मंदिरात चोऱ्या केल्याचे तपासात उघड झाले. तो एकटा हे गुन्हे करतो की, त्याचे आणखी साथीदार आहेत, याचा शोध कोपरी पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here