म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने पश्चिम महाराष्ट्रातील १७४ गावांसह ११०८ वाड्यावस्त्यांमधील सुमारे साडेतीन लाख नागरिकांना पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी त्यांना पायपीट करण्याची वेळ येत असल्याने १९९ टँकरद्वारे त्यांची तहान भागविली जात आहे. त्यात पुणे जिल्ह्यात ५०, तर सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यावेळेपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. जून महिन्यापर्यंत पावसाने ओढ दिली होती. त्यानतंर २६ जूननंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच्या दमदार हजेरीनंतर जुलैमध्ये पाण्याची समस्या कमी झाली. त्यामुळे जूनपर्यंत सुरू झालेल्या टँकरची संख्या कमी झाली होती. पुणे जिल्ह्यात त्यावेळी टँकरची संख्या २६ पर्यंत खाली पोहोचली होती. जुलै महिन्याच्या अखेरीसपासून ते संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे. त्याशिवाय सप्टेंबरच्या अर्धा महिना कोरडा गेला आहे. तुरळक स्वरुपात पावसाने हजेरी लावली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये फारशी पाणीसाठ्याची वाढ झालेली दिसत नाही. उलट पश्चिम महाराष्ट्रातील वाड्या वस्त्यांमध्ये आता पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरची मागणी वाढल्याचे चित्र आहे.

कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय : अजित पवार

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नऊ, जुन्नरमध्ये दहा , पुरंदरमध्ये दहा, खेडमध्ये आठ तर शिरूर तालुक्यात सर्वाधिक तेरा टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे जिल्हयातील भोर, वेल्हा, बारामती, दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी, हवेली या तालुक्यात अद्याप एकही टँकर सुरू नाही. पुणे जिल्ह्यात सध्या ५० टँकरने पाणी ३८ गावांसह २८३ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. या टँकरने एक लाख आठ हजार ४८३ नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत असून त्यांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २३ विहिरी, बोअरचे अधिग्रहण केले आहे. ५० टँकर्समध्ये नऊ सरकारी तर ४१ खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली.
प्रियकरासाठी लाखोंचं कर्ज काढलं, कार घेतली, त्यानं हफ्ते थकवले अखेर तिनं टोकाचं पाऊल उचललं अन् सर्व संपलं…
एकमेव कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राधानगरी धरण भरल्याने पाण्याची समस्या जाणवत नसल्याने जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू नसल्याचे विभागीय आयुक्तलयाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
…तर शिंदेसाठी बाळासाहेबांनी हातात उसाचा बुडका घेतला असता; राजू शेट्टी संतापले
पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९७ टँकरने एक लाख ३७ हजार ८०८ नागरिकांची तहान भागविली जात आहे. साताऱ्यात ९१ गावे आणि ४३७ वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा होत आहे. सांगली जिल्ह्यात ३७ टँकरने ३१ गावांसह २६७ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. तर सोलापूर जिल्ह्यात १५ टँकरने १४ गावांसह १२१ वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात १९९ टँकरने १७४ गावांसह ११०८ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करून त्यांची तहान भागविली जात आहे. १९९ टँकर्समध्ये १७४ टँकर्स हे खासगी असून २५ हे सरकारी टँकर्स आहेत,असेही विभागीय आयुक्तालयाने स्पष्ट केले.

आशिया कप फायनलसाठी असणाऱ्या राखीव दिवसाचे नियम आहेत तरी काय, किती षटकांचा सामना होणार पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here