म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा निर्णय २०१६ मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परंतू त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याचा खून केला,’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, ‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी चार ऑक्टोबर २०१६ रोजी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा निर्णय घेण्यात आला. कामे सुरू करण्यात आली. राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचनासाठी ३३७ कोटींचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. वॉटर ग्रीडला मान्यता देतानाच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले गेले. शेती, पिण्याचे पाणी व उद्योगांना देखील वॉटर ग्रीडला लाभ होईल, असे नियोजन आखण्यात आले आणि पुढे कार्यवाहीदेखील सुरू झाली.’ ‘निविदा काढण्यात आल्या. परंतु सत्ताबदलानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली. या ठाकरे सरकारने वॉटर ग्रीडला स्थगिती दिली. आता या वॉटर ग्रीड संदर्भात विरोधक कशाच्या आधारे प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही,’ असेही ते म्हणाले. ‘हर घर जल या योजनेच्या माध्यमातून केंद्राने निधी दिला आहे. त्या माध्यमातूनच कामे सुरू असून, वॉटर ग्रीडसाठी नव्याने प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे,’ अशी माहिती देखील त्यांनी दिली.