कोकणात जाण्यासाठी अलायन्स एअर कंपनीकडून मुंबई-सिंधुदुर्ग (चिपी)-मुंबई अशी विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी आठवड्यातून चार वेळा चालवली जाते. त्यासाठी एटीआर ७२ या लहान आकाराच्या विमानाचा वापर होतो. एरवी या विमानाचे तिकीट सरासरी १८०० ते २८०० रुपयांदरम्यान असते; मात्र गणपतीसाठी गर्दी वाढती असल्याची संधी साधून कंपनीने तिकीटदर मोठ्या प्रमाणात वाढविले आहेत.
गणेशोत्सवाची खरी सुरुवात मंगळवार, १९ सप्टेंबरपासून होत आहे. त्यामुळे कोकणवासी सोमवारीच गावी दाखल होण्याच्या बेतात आहेत. मात्र, नेमक्या त्याच दिवशीचे तिकीट हे १५ हजार ५९३ रुपये झाले आहे. शनिवारी देखील प्रवाशांनी हाच भरमसाठ दर मोजत आपले गाव गाठले. मंगळवारचे तिकीट सोमवारपेक्षा स्वस्त असले तरीही ते ६१९५ रुपये आहे.
गणेशोत्सवादरम्यान गौराईचेही महत्त्व असते. यंदा ज्येष्ठा गौरींचे आगमन गुरुवारी होत असून शुक्रवारी पूजनाचा मोठा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारीदेखील या प्रवासाचे तिकीट तब्बल ९८१८ रुपये इतके आहे.
अनेकजण पाच दिवसांचा गणपती करून त्याच दिवशी गौरी विसर्जन असल्याने ते करून तातडीने मुंबईला परतण्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे शनिवारचे परतीचे तिकीटदेखील तब्बल १२ हजार ४४१ रुपयांवर गेले आहे. पुढे दोन दिवस आराम करुन सोमवारी परतणाऱ्यांना तर या प्रवासासाठी तब्बल १९ हजार ११० रुपये मोजावे लागणार आहेत. २८ रोजी दहा दिवसांचे विसर्जन करून शनिवारच्या विमानाने परतणाऱ्यांना ७७१८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर २ ऑक्टोबरचे तिकीटदेखील ९८१८ रुपये आहे.