मुंबई : मुंबईमध्ये सोमवारपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने यलो अॅलर्ट दिला असला तरी शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र रविवारी आणि सोमवारीही मुंबईत यलो अॅलर्ट आहे तर मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. त्यामुळे गणेश आगमनाच्या वेळी फारसा पाऊस नसेल, अशी आशा मुंबईकर भाविक करत आहेत.

कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर शनिवारी शून्य मिलीमीटर पावसाची सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र स्वयंचलित केंद्रांवरील नोंदीनुसार सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत मुंबई परिसरात जेमतेम ५ ते १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारच्या दिवशी तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही मुंबईत शक्यता वर्तवण्यात आली आहे. गणपती आगमनाच्या आधीचा हा शेवटचा रविवार असल्याने मुंबईकर भाविक खरेदीसाठी रविवारी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Konkan Ganeshotsav: कोकणात गणपतीसाठी विमानाने जाताय; मोजावे लागतील ‘इतके’ रुपये
ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये रविवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच दक्षिण कोकणातही रायगड आणि रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवार दोन्ही दिवस उत्तर कोकण तसेच दक्षिण कोकण विभागामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या वेळीही मुंबईकर, तसेच ठाणे, पालघर परिसरातील नागरिक यांना पावसाचा अडथळा निर्माण होणार नाही, अशी शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

गणपती आगमन आणि विसर्जनामध्ये पावसाचा अडथळा नको ,अशी इच्छा अनेक भाविक व्यक्त करत असले तरी महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचेही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सक्रीय झालेल्या पावसाचा फायदा उत्तर मध्य महाराष्ट्राला होऊ शकतो, असे पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे इतर भागांसाठी चिंता कायम आहे असेही त्यांनी म्हटले आहे. शनिवारी वर्तवलेल्या पुढील पाच दिवसांच्या पूर्वानुमानानुसार संपूर्ण राज्यात येत्या आठवड्याच्या सुरुवातीला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सोमवार ते बुधवार या कालावधीत पावसाचा जोर राज्यात सर्वदूर नसेल, असा अंदाज आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम विशेष: कल्हाळी गावातील गढीवर फडकावला होता तिरंगा, ३ दिवस रझाकारांशी कडवी झुंज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here