राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाच्या परिवारातील ३६ संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात झाली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह संघ परिवारातील महिला संघटनांच्या ३० प्रतिनिधीही उपस्थित होत्या.
या बैठकीच्या सांगतेप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी या बैठकीत प्रामुख्याने महिलांचा संघकार्यात तसेच सामाजिक जीवनातील सहभाग वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे नमूद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. संघाची समन्वय बैठक पूर्वनिश्चित असते. यात संघटनांच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाते. मात्र, केंद्र सरकारने अचानक १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात नेमके कुठले विषय समोर येणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, राष्ट्रीय समन्वय बैठक यापूर्वीच होणार असल्याने समन्वय बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते.
महिला आरक्षण विधेयक मांडणार?
आता या बैठकीत महिलांचा संघकार्यातील; तसेच एकूण समाजकार्यातील सहभाग वाढविण्यावर चर्चा झाल्याने संसदेच्या या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची शक्यता बळावली आहे, असा दावा उच्चस्तरीय सूत्रांनी केला.