दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात दोन एसी डबे जोडण्यात आले. मात्र त्याचे आरक्षण कधी सुरु होणार ते नियोजन करून वेळेत प्रसारित करण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांना या डब्यांची प्रतीक्षा करावी लागली. आरक्षण ऑनलाईन दिसताच काही मिनिटातच हे डबे गणेशभक्तांकडून फुल्ल झाले. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरती अनेक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरून ०९००९ मुंबई सेंट्रल सावंतवाडी गणपती स्पेशल १५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजता ही स्पेशल ट्रेन पनवेल रेल्वे रेल्वे स्थानकात दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पनवेल येथे आल्यावर एसी व स्लीपर कोचच्या डब्यांमध्ये अचानक बदल केला गेला व ट्रेन अवघ्या तीन मिनिटात सुटल्याने अनेक कुटुंबांची तारांबळ उडाली. त्यामुळे अक्षरशः चेन खेचून ट्रेन थांबवण्याची वेळ प्रवाशांवर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान सीएसएमटी, दादर, ठाणे येथे अनेकदा आयत्यावेळी हा डब्यांचा बदललेला क्रम जाहीर केला जातो. विशेषतः मान्सून टाईम टेबल नंतर आणि वंदे भारत सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती आणखी वाढली आहे अशी महत्त्वाची प्रतिक्रिया चिपळूण येथील प्रवासी डॉक्टर मिलिंद गोखले यांनी ‘मटा’ ला जवळ बोलताना दिली.
पनवेल रेल्वेस्थानकात शुक्रवारी मध्यरात्री मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सावंतवाडीला जाणारी स्पेशल एक्सप्रेस रेल्वे सकाळी सव्वाआठ वाजता आली. हाच अनुभव दिवा रेल्वे स्थानकातही प्रवाशांना येत आहे. नेमका खोळंबा व हा सगळा गोंधळ कशामुळे झाला याचे उत्तर प्रवाशांना स्थानकात दिले जात नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा सोपा व जलद असतो त्यामुळे अनेक जणांचा ट्रेनच्या आरक्षणाकडे स्वाभाविकपणे कल आहे. मात्र कोकणात येणाऱ्या गाड्यांचे नियोजन व व्यवस्थापन योग्य प्रकारे रेल्वे प्रशासनाकडून कोकण व्यवसायांना कोणत्याही त्रास होणार नाही या प्रकारे अनेकदा केले जात नसल्याचा आरोप कोकणातील प्रवासी संजय सावंत यांनी केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून गणेश उत्सवासाठी विशेष गाड्या सोडण्यात आले असल्या तरी पनवेल व दिवा रेल्वे स्थानकात होणाऱ्या त्रासामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.