कोलंबो: श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे पाकिस्तानचं आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. श्रीलंकेनं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे पाकिस्तानचा २ गडी राखून पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात विजय मिळवत लंकेनं पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानी संघातील हेवेदावे समोर आले आहेत.पाकिस्तानचा संघ ड्रेसिंग रुममध्ये परतताच कर्णधार बाबर आझमनं संघातील खेळाडूंना फैलावर घेतलं. एकदिवसीय संघांची क्रमवारी पाहिल्यास पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ क्रमांक एकचा संघ वाटलाच नाही. आपली कामगिरी अव्वल संघाला साजेशी नव्हती, अशा शब्दांत आझमनं संघाला सुनावलं.बाबर आझमनं संघातील सहकाऱ्यांना सूचक इशारादेखील दिला. ‘स्वत:ला सुपरस्टार समजणं बंद करा. विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यास कोणीही तुम्हाला सुपरस्टार समजणार नाही,’ अशा शब्दांत त्यानं संघाला धारेवर धरलं. संघातील काही खेळाडू स्वत:ला सुपरस्टार समजतात. पण संघाला गरज असताना चांगली कामगिरी करावी लागते, असं बाबर पुढे म्हणाला. त्यावेळी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनं बाबरला रोखलं. संघातील खेळाडूंच्या कामगिरीचं किमान कौतुक तरी करायला हवं, असं आफ्रिदी म्हणाला. त्यावर कोणी चांगली कामगिरी केली ते मला माहीत आहे, असं म्हणत बाबर त्याच्यावर संतापला.बाबर आणि आफ्रिदी यांच्यात खटका उडाला. आपल्या कामगिरीवर लक्ष द्या, अशा शब्दांत बाबरनं सगळ्यांना सुनावलं. या वादात वरिष्ठ खेळाडू मोहम्मद रिझवाननं मध्यस्थी केली. त्यानं वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर संघ स्टेडियममधून हॉटेलला रवाना झाला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बाबर कोणाशीच काही बोलला नाही. कोणालाही काहीच न कळवता तो श्रीलंकेतून निघून गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here