लखनऊ: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना एका तरुणाला हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरस्वती विहारच्या वॉर्ड क्रमांक २६ मध्ये राहणारा सिद्धार्थ सिंह जिममध्ये गेला होता. दुपारी बाराच्या सुमारास ट्रेलमिलवर चालताना तो एकाएकी कोसळला. पुढच्या काही क्षणांमध्ये जिममधील इतर तरुण त्याच्या दिशेनं धावले. पण त्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी अद्याप तरी पोलिसांना कोणतीही तक्रार मिळालेली नाही.गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशच्याच लखमीपूर खिरीमधील चित्रपटगृहात गदर २ सिनेमा पाहायला गेलेल्या एका तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ तरुणाला हृदय विकाराचा झटका आला. ही घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. मृत पावलेला तरुण द्वारकापुरीचा रहिवासी होता.अष्टक तिवारी (३२) नावाचा तरुण रात्री पावणे आठच्या सुमारास फन चित्रपटगृहात गदर २ पाहायला गेला होता. मोबाईलवर बोलता बोलता तो चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. तितक्यात तो अडखळून खाली पडला. उपस्थितांनी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मोबाईल लॉक नसल्यानं तिथे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याच्याच मोबाईलचा वापर करुन कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीनं चित्रपटगृह गाठलं. अष्टकला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here