अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागाातर्फे मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या तब्बल ३०हून अधिक अभियंत्यांचा सत्कार सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे षणमुखानंद सभागृहाबाहेर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली, तर यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी मनसेतर्फे यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करण्यात आली.
यासंदर्भात संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या ज्या अभियंत्यांनी फुकटचा सत्कार करून घेतला आहे. त्यांनी तो परत करावा अन्यथा ‘मनसे स्टाइल’ने त्यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच एकेरी मार्गिका (सिंगल लेन) तयार झाली, अशी खोटी बोंब ठोकणाऱ्या रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू करण्यात आलेल्या एकेरी मार्गिकेबद्दलही मनसेने केलेल्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’ची माहिती त्यांनी यावेळी दिली.